नाशिक येथील टीसीएस (TCS) कंपनीच्या कार्यालयात घडलेल्या कथित लैंगिक छळ, शोषण आणि धर्मांतर प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) शुक्रवारी आपले पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याप्रकरणी सत्र न्यायालयात हे १५०० पानांचे विस्तृत आरोपपत्र सादर करण्यात आले.
हे आरोपपत्र दानिश एजाज शेख, तौसिफ बिलाल अत्तार, निदा एजाज खान आणि मतीन मजीद पटेल यांच्या विरोधात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण ९ एफआयआर (FIR) नोंदवले असून ८ जणांना अटक केली आहे. फरार असताना निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी आश्रय दिल्याचा आरोप एआयएमआयएमचे (AIMIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर आहे.
भारतीय न्याय संहितेची विविध कलमे आणि पुरावे
पोलिसांनी या आरोपपत्रात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांचा समावेश केला आहे. यामध्ये गुन्हेगारी कट (कलम ६१(२)), बलात्कार (कलम ६४), अधिकाराचा गैरवापर करून लैंगिक संबंध (कलम ६८), फसवणूक करून लैंगिक संबंध ठेवणे (कलम ६९), लैंगिक छळ (कलम ७५), फसवणूक (कलम ३१८(४)), धार्मिक भावना दुखावणे (कलम २९९), गुन्हेगाराला आश्रय देणे (कलम २४९) यांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (Atrocities Act) तरतुदींचाही समावेश आहे. याशिवाय पीडित आणि आरोपी यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्सचे (WhatsApp) स्क्रीनशॉट्स आणि जप्त केलेले ईमेलचे पुरावेही पोलिसांनी आरोपपत्रात जोडले आहेत.
टीसीएसची 'झीरो टॉलरन्स' नीती
नाशिक टीसीएस युनिटमध्ये झालेल्या छळाच्या तक्रारी घेऊन आठ महिला पुढे आल्या होत्या. त्यानंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एक आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या टीसीएस कंपनीने स्पष्ट केले होते की, कोणत्याही प्रकारचा छळ किंवा सक्ती कंपनी खपवून घेणार नाही (Zero-tolerance policy). तसेच, या लैंगिक छळाच्या प्रकरणात कथितरित्या सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने तात्काळ निलंबित केले आहे.