अमीर सुहैल वानी
हजारो वर्षांपासून भारतात वेगवेगळ्या वंशाचे, समुदायांचे, जातींचे, धर्माचे लोक एकोप्याने राहतात. भारत हा विविधतेत एकता जपणारा एकमेव देश आहे, असे म्हणले तर वावगे ठरू नये.येथे विविध धर्माचे लोक पुष्पहारातील फुलांप्रमाणे राष्ट्राच्या अखंडतेसाठी,भरभराटीसाठी आपल्या परीने योगदान देत आले आहेत. यातूनच एक विशाल भारत आकाराला आला.
भारत हे जगातील सर्व प्रमुख धर्मांचे आश्रयस्थान आहे. येथे लहान-लहान धर्मांनाही आपुलकीने सामावून घेतले जाते. त्यांचे रीतीरिवाज, धार्मिक परंपरांना यांचे स्वतंत्र अबाधित राखले जाते. यामुळेच भारताला एक वेगळा इतिहास लाभला आणि त्यातूनच विविधतेने नटलेला आपला देश आकाराला आला. विविध भागांतील विविध धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
धार्मिक विविधता असलेल्या भारतासारख्या देशात ‘धर्म’ हा एक अत्यंत महत्वाचा आणि गरजेचा घटक आहे. विविध धार्मिक सणांचा राष्ट्राच्या निर्मितीत महत्वाचा वाटा आहे. त्यांनीच लोकांना एकत्र आणले आहे. ईद, बैसाखी, गुरुपूरब आणि ख्रिसमस इ. सर्वच सण भारतीय तेवढ्याच उत्साहात साजरे करतात. या सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळेच वैशिष्ट्यामुळे भारतात एकता नांदते.
याच सामाजिक बांधिलकीतून गांधी, अबुल कलाम आणि अशा अनेक धार्मिक नेत्यांना सर्व धर्मातील लोकांनी स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिले. या नेत्यांनीही राष्ट्राच्या उभारणी पासून ते लोकांना एकत्र आणण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
दिल्लीतील निजामुद्दीन औलियाची दर्गा, अमृतसरचे सुवर्ण मंदिर आणि काश्मीरमधील श्रीनगरयेथील शंकराचार्य मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळी सर्व धर्मांचे लोक नतमस्तक होण्यासाठी येतात. ही धार्मिक स्थळे राष्ट्रीय एकात्मतेचा दुवा म्हणून काम करतात. सुवर्ण मंदिरासारख्या ठिकाणी केवळ शीखच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदूही श्रद्धेने माथा टेकतात. परोपकार, निराधारांना मदत आणि विधायक कार्य यां सारख्या बाबींतून विविध धर्मांनी राष्ट्र उभारणीत योगदान दिले सोबतच इस्लाम, ख्रिश्चन, हिंदू आणि इतर धर्मांच्या संरचनेत देशभक्ती निर्माण केली.
इस्लाम आपल्या अनुयायांना त्यांच्या मातृभूमीवर प्रेम करण्याचे आवाहन करतो. देशावर असणारे हे प्रेम व्यक्त करण्यासही सांगतो. त्याचप्रमाणे, ख्रिश्चन धर्मही देशभक्तीच्या मूल्यांचे समर्थन करतो. यावर सीएस लुईस म्हणतात, "देशावरचं निस्सीम प्रेम आपल्याला देवाच्या प्रेमासह अंतिम प्रेमाकडे नेते".
शेकडो वर्षांपासून मुस्लिम संत परस्परांविषयी प्रेम आणि बंधुभाव जोपासण्याची शिकवण देत आले आहेत. लोकांच्या मनात एकमेकांविषयी आणि अंतिमत: देशाविषयी प्रेमाची भावना वाढीस लागली राष्ट्र उभारणीच्या कार्यात याचा मोठा हातभार लागला. या सुफी गुरुंनी लोकांना धर्म-पंथ यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्यास सांगितले. याचा प्रेम, परस्पर सौहार्द आणि एकात्मतेवर सकारात्मक परिणाम झाला. देवस्थान आणि लंगर (सामुदायिक स्वयंपाकघर) सर्वांसाठी खुले करून या सुफी संतांनी लोकांमध्ये परस्पर संबंधांची आणि मानवतेवरील अतूट विश्वासाची भावना प्रबळ केली.
‘कुणावरही धर्माची सक्ती नाही’ आणि ‘प्रत्येक समुदायाला त्याचा धर्म, तुम्हाला तुमचा धर्म’ यांसारख्या गोष्टी इस्लाम आपल्या अनुयायांना शिकवतो. त्यामुळे इतर धर्मांप्रती आदर तयार होतो आणि स्वदेशाबद्दल प्रेमाची भावनाही विकसित होते. इस्लामच्या प्रेषितांनी आपल्या शिकवणुकीद्वारे हक्काप्रती जागरुक समाजाचा नव्हे, तर कर्तव्याप्रती जागरूक समाजाचा पाया घातला.
पैगंबर म्हणतात, "आस्तिकाने कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि जेथे हक्कांचा प्रश्न येतो त्यावेळी देवाकडे मागणे मागितले पाहिजे." सर्वोत्तम समाज म्हणजे कर्तव्याची जाणीव असलेला समाज. एका व्यक्तीचे कर्तव्य हा दुसऱ्याचा अधिकार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावले तर सर्वांचे हक्क जपले जातील. आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःचे हक्क मागत, आंदोलन करत बसला तर यातून काहीही साध्य होणार नाही. समृद्ध राष्ट्राच्या उभारणीचा सर्वात भक्कम पाया कर्तव्ये पार पाडणे हाच आहे.
स्वामी विवेकानंद, श्री अरबिंदो, अबुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांसारख्या अनेक महान लेखकांनी देशभक्ती, सद्भाव आणि राष्ट्रनिर्मिती या विषयांवर लेखन केले. प्रत्येकाने आपापल्या धार्मिक शिकवणीनुसार ते लिखाण केले असले तरीही सर्वांच्या लिखाणातून धर्मासोबत राष्ट्रावर प्रेम करण्याची शिकवण दिल्याचे दिसते. त्यांच्या लिखानाने आधुनिक भारताला आकार देण्यात आणि लोकांना एकत्र बांधून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
मात्र दुर्दैवाने या महान व्यक्तींच्या या शिकवणुकीविषयी आता विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये फारसे शिकवले जात नाही. शिक्षणसंस्थांचा हा संकुचित दृष्टीकोन देशभक्ती आणि सकारात्मक राष्ट्रवादाच्या मार्गात अडथळा ठरत आहे. आधुनिक भारतातील राष्ट्रनिर्मितीसाठी आंतर-धर्म संवाद आणि आंतर-धार्मिक सौहार्दाचे महत्त्वही लक्षात घेणे गरजेचे आहे.
बरेचदा धर्मांतील मतभेद हिंसाचारापर्यंत येऊन ठेपतात. हे प्रकार टाळायचे असतील तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी एकमेकांचा धर्म चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. त्यातूनच एकता आणि राष्ट्रीय शांततेचा मार्ग मोकळा प्रशस्त होऊ शकेल.
विविध धर्मियांमधील कट्टरतावादाचा उदय हा राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेसाठी एक मोठा धोका ठरू लागला आहे. अतिरेकीपणा आणि फुटीरतावादी चळवळी यांच्या वेळीच मुसक्या आवळून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. धार्मिक कट्टरतावादी शक्तींना राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेच्या मूलभूत तत्वांशी छेडछाड करण्यास आळा घातला पाहिजे. याउलट समाजात सर्व स्तरातून एकमेकांप्रती प्रेम आणि सामंजस्य पसरवले गेले पाहिजे.
इस्लाम, ख्रिश्चन, शीख, झोरास्ट्रियन, जैन, ज्यू आणि इतर धर्मांनी आपापल्या परीने भारताच्या वैभवातमोठी भर टाकली आहे. आधुनिक काळात, फुटीरता आणि कट्टरतावादाचा धोका कमी करून धार्मिक शक्तींचा वापर राष्ट्र उभारणी किंवा देशप्रेम वाढवण्यासाठी करणे मोठे आव्हानात्मक आहे. त्यामुळे तळागाळातील धर्मुगुरूंपासून ते राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांपर्यंत सर्वांच्याच खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. समाजात एकता, सौहार्दवाढवणे, त्यांना राष्ट्रनिर्मिती आणि देशभक्तीच्या मार्गावर नेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.
धार्मिक बहुलवाद आणि विविधता हे भारताचे मुकुटमनी आहेत. जगात भारताची हीच ओळख आहे. भारताने जगाचे नेतृत्व करण्याची आणि जगाला एकत्मतेचा व विविधतेचा मार्ग दाखवण्याची आज सर्वाधिक गरज आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण निस्वार्थपणे राष्ट्रात्वाची भावना जोपासेल आणि मातृभूमी व देशप्रेम यांना सर्वोच्च प्राधान्य देईल तेव्हाच हे शक्य होईल!
(अनुवाद : पूजा नायक)
- अमीर सुहैल वानी