मुस्लिम समाजातील प्रतिमा बदलण्यासाठी संघ करणार विशेष प्रयत्न

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
विविध उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यावरी भर देणार
विविध उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यावरी भर देणार

 

हरियानातील पानिपत येथे आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरूवात झाली. या सभेमध्ये रा.स्व.संघ आणि संघाशी निगडित असलेल्या विविध संस्थांच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच या बैठकीमध्ये रा. स्व. संघाच्यावतीने सुरू असलेल्या समाज-जागृतीच्या विविध उपक्रमांत, महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती रा.स्व. संघाचे सह-सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी माध्यमांना दिली.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवस चालणाऱ्या या प्रतिनिधी सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहेत, त्याचप्रमाणे विविध ठराव देखील मांडण्यात येणार आहेत. 

मुस्लीम समाजापर्यंत पोहोचण्यासाठीही संघ कृतिकार्यक्रम आखणार आहे. त्यासाठी 'राष्ट्रीय मुस्लीम मंच' या संघाच्या विभागाद्वारे पविशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मुस्लिमांच्या मनातील संघाची नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी आता विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, रा.स्व. संघाच्या वतीने सुरू असलेल्या समाज-जागृतीच्या विविध उपक्रमांत महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे रा.स्व. संघाचे सह-सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे रा.स्व. संघाशी निगडित असलेल्या ‘राष्ट्र सेविका समिती’या संघटनेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वावलंबनावर भर देणारा ठराव देखील या बैठकीमध्ये पारित करणार असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आगामी काळात संघाच्या शाखांची संख्या एक लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१७ ते २०२२ या कालावधीत सुमारे सव्वासात लाख तरुण, हे ‘जॉईन आरएसएस’ या संघाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रा.स्व. संघाशी जोडले गेले असल्याची माहिती वैद्य यांनी दिली.

मुलायम, शांतिभूषण यांना श्रद्धांजली
रा.स्व संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीमध्ये रविवारी मुलायमसिंह यादव, शरद यादव, शांतिभूषण यांच्यासह मागील वर्षी निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये ओडिशाचे मंत्री नबाकिशोर दास यांना आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सागर साहू आणि बुधराम करटान यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी, अभिनेते सतीश कौशिक आणि जावेद खान अमरोही यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.