प्रेषित मुहम्मद यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सुरेखा कांबळे यांनी मिळवले बक्षीस

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 5 Months ago
बक्षीस स्वीकारताना सुरेखा कांबळे
बक्षीस स्वीकारताना सुरेखा कांबळे

 

पुण्यातील ‘वर्क चॅरिटेबल ट्रस्ट’द्वारे चालवण्यात येणाऱ्या ‘वर्क फोर कंपॅशन’ आणि निसार फौंडेशन यांच्यामार्फत ‘प्रेषित मोहम्मद सर्वांसाठी’ या विषयावर एका प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच कोंढवा येथील मदनी मस्जिदमध्ये पार पडला.

१७  सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या काळात मुस्लिम हिजरी सणाचा रब्बीउल अव्वल महिना असतो. प्रेषित मुहम्मद यांचा जन्म याच महिन्यात झाला होता. या अनुषंगाने पुण्यातील ‘वर्क चॅरिटेबल ट्रस्ट’द्वारे चालवण्यात येणाऱ्या ‘वर्क फोर कंपॅशन’ या उपक्रमाअंतर्गत हा महिना करुणेचा, दयेचा महिना या नावाने साजरा केला जातो. यानिमित्त ‘वर्क चॅरिटेबल ट्रस्ट’ अणि कोंढवा भागातील ‘निसार फौंडेशन यांच्यामार्फत ‘प्रेषित मोहम्मद सर्वांसाठी’ या विषयावर एका प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते.याचा निकाल २१ ऑक्टोबर रोजी घोषित करण्यात आला होता.

दया आणि करुणेचे प्रतीक असलेल्या प्रेषितांच्या आयुष्यातील आदर्श आपल्या जीवनात उतरावे यासाठी त्यांच्या जीवनाशी संदर्भात या प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. सात वर्षांपुढील सर्व भारतीयांसाठी ही स्पर्धा खुली होती. या स्पर्धेत तब्बल १३ हजार स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. त्यापैकी ४५ स्पर्धकांची बक्षिसांसाठी निवड करण्यात आली. 

या स्पर्धेत मुस्तकीम मुजावर यांना पाहिला तर दुसरा व तिसरा पुरस्कार अनुक्रमे अमीर आणि अब्दुल रशीद यांना मिळाला. विशेष म्हणजे या स्पर्धेत सुरेखा कांबळे यांनी चौथा क्रमांक पटकावला. त्या पेशाने वकील आहेत. आणखी एक कौतुकाची बाब म्हणजे अनाथाश्रमातील एका विद्यार्थ्याने या स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला.. त्याला सायकल मिळाली.

पहिल्या विजेत्याला मक्का या शहरात 'उमरा'चा म्हणजे तीर्थयात्रेचा प्रवास घडवला जाणार आहे. पुण्यातील ‘अल तकवा - हज अँड उमरा ट्रॅव्हल्स’ यांच्यातर्फे ही यात्रा घडवून आणली जाणार आहे.याशिवाय दुसऱ्या क्रमांकाला लॅपटॉप, तिसऱ्याला टॅबलेट,चौथ्या क्रमांकाला वाशिंग मशीन तर पाचव्या क्रमांकासाठी सायकल बक्षीस देण्यात आली. उर्वरित ४० विजेत्यांना उत्तेजनार्थ स्टडी टेबल आणि स्मार्ट घड्याळ बक्षीस म्हणून देण्यात आले.

स्पर्धेत प्रथम आलेल्या मुस्तकीम मुजावर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “ ईश्वराची आमच्यावर मोठी कृपा आहे, कारण त्याने या पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला त्याच्या दरबारी म्हणजे मक्का येथे येण्याचे आमंत्रण दिले. प्रत्येक मुस्लिमानाचे तिथे जाण्याचे स्वप्न असते. या स्पर्धेमुळे आमचे हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. मी आणि माझे कुटुंब आयोजकांचे खूप आभारी आहोत.” 

या स्पर्धेत चौथे पारितोषिक पटकावणाऱ्या सुरेखा कांबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी धार्मिक सौहार्दाचे अनोखे उदाहरण समाजापुढे ठेवले होते. स्पर्धेत पुरस्कार मिळवून तर त्यांनी मोठा आदर्श निर्माण केला आहे.  सुरेखा या इकरा इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.. या स्पर्धेत सहभागी का व्हावंसं वाटलं असं विचारलं असता त्या म्हणाल्या, 'विद्यार्थ्यांकडून प्रेरित होऊन मी या स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा सर्व जाती-धर्म आणि प्रांतातील लोकांसाठी खुली होती. भारतभरातून अनेकजण या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा धार्मिक सलोख्याला चालना देणारी आहे असे वाटल्यामुळे मी या  स्पर्धेत भाग घेतला. 

स्पर्धेसाठी तयारी कशी केलीत असे विचारले असता त्या म्हणाल्या, “मी सुरुवातीला प्रेषित मुहम्मद यांच्याविषयी एक पुस्तक वाचले. त्यातून मला काही माहिती मिळाली. याशिवाय माझ्या मनात काही प्रश्न होते, त्याविषयी माझ्या शाळेतल्या मुस्लीम सहकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रक्रियेतून मला प्रेषितांच्या जीवनाविषयीची महत्त्वाची माहिती मिळवता आली.

पाचव्या क्रमांकाचे बक्षीस लक्ष्यवेधी ठरले.अनाथाश्रमातील अलीम शेख या विद्यार्थ्याला बक्षीस मिळाले. बक्षीस स्वीकारताना तो फार भावनिक झाला होता.  ‘मला खूप आनंद झालाय’ इतकंच  तो बक्षीस स्वीकारताना बोलू शकला. 

या  कार्यक्रमाला कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनावणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे  कौतुक केले. ते म्हणाले,  “आजच्या काळात धार्मिक सलोखा वाढवणाऱ्या यासारख्या उपक्रमांची मोठी गरज आहे. 'वर्क फोर कंपॅशन' चे काम कौतुकास्पद आहे. समाजासाठी ते खूप उपयुक्तही आहे. आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढुन ही मंडळी तो वेळ सत्कर्मासाठी वापरतात. त्यामुळे अशा लोकांची आणि उपक्रमांची समाजाला आवश्यकता आहे.

या कार्यक्रमाला निवृत्त जज एबीएम शेख, सामाजिक कार्यकर्ते आणि मस्जिद कृती कमिटीचे अध्यक्ष झहीदभाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय महिला गटाच्या प्रमुख सलमा पठाण, इरफान कार्तिक, शाहनावाझ पठाण आदी मंडळी होते. यासोबतच  वर्क फोर कंपॅशन आणि निसार फौंडेशन या दोन्ही संस्थाचे कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.