राज्य सरकार करणार धर्मांतर, लव्ह जिहादविरोधात कायदा

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
पोलिसांसाठी एसओपी करणार तयार
पोलिसांसाठी एसओपी करणार तयार

 

मुंबई : ‘‘फसवणुकीच्या इराद्याने, बळजबरी किंवा आमिष दाखवून जर कोणी लग्न करीत असेल तर ते रोखायला हवे. राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधी कायदा लवकरच तयार करण्याचा विचार करत असून त्यासाठी विविध राज्यांच्या कायद्यांचाही अभ्यास केला जात आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. त्याचबरोबर कोणत्याही जाती - धर्मातील कोणीही कोणाशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. त्या अधिकाराला या समितीमुळे कुठेही बाधा येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धर्मांतर किंवा लव्ह जिहाद प्रकरणांचा शोध जलदगतीने करण्यासाठी पोलिस महासंचालकांना सांगून पोलिसांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये आदिवासी महिलेने दाखल केलेल्या धर्मांतरविरोधी तक्रारीबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला. सरकारने स्थापन केलेल्या आंतरधर्मीय विवाह परिवार समितीकडे आतापर्यंत किती तक्रारी आल्या. त्यावर सरकारने काय कारवाई केली, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर ही समिती पालक आणि मुलीशी संपर्क साधून पुन्हा संवाद घडवून आणण्याचे काम करते. श्रद्धाला वेळेत मदत मिळाली असती तर हत्या रोखता आली असती, मात्र सध्या किती तक्रारी आल्या आहेत, याची माहिती माझ्याकडे नाही असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मनीषा कायंदे, भाई जगताप, प्रवीण दरेकर, उमा खापरे यांनीही उपप्रश्न विचारले.
 
स्वेच्छेने लग्नाचा अधिकार
स्वेच्छेने लग्नाचा अधिकाराचा मुद्दा लक्षात घेतल्याशिवाय अशा प्रकारच्या कायद्यावर कसा विचार करावा यावर अधिक चर्चा करण्याची गरज असल्याचे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. स्वजातीमध्ये लग्न करण्याची इच्छा असणाऱ्यांची देखील ‘सैराट’ केले जाते, असे वास्तव सभागृहासमोर व्यक्त करत या चर्चेला त्यांनी विराम दिला.