नमदा - जगप्रसिद्ध गालिचा आणि तिचा काश्मिरी वारसा

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 9 Months ago
नमदा गालीचा
नमदा गालीचा

 

जम्मू आणि काश्मीर हे भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. इथल्या अनेक गोष्टी जगप्रसिद्ध आहे. काश्मीरमधील केसर, सफरचंद, हस्तकला आदी गोष्टी लोकप्रिय आहेत. विशेषतः काश्मिरी हस्तकला ही काश्मिरी लोकांची आणि कारागिरांची पारंपारिक कला आहे. ते हाताने वस्तू बनवून त्यांवर  हस्तकला करतात आणि सजवतात.
 
याच हस्तेकलेमधील नमदा गालीचा हा प्रकारही प्रसिद्ध होता. नामदा हे जम्मू-काश्मीरच्या स्थापत्य इतिहासाचे एक भव्य उदाहरण आहे. हा हाताने तयार केलेला गालिचा असतो. याला विणण्याऐवजी फेल्टिंग लोकरने बनवला जातो. परंतु काळाच्या ओघात हे गालिचे बनवण्याची कला लुप्त झाली. गालिच्यासाठी  लागणारा कच्चा माल, त्यासाठी लागणारे विशेष कौशल्य आणि बाजारपेठ या सर्वांचीच कमतरता असल्यामुळे या कलेला उतरती कळा लागली होती.

काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर संस्कृती संवर्धनासोबतच तिथल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून नवनवीन योजना आखल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून काश्मीरचे वैशिष्ट्य असलेल्या या नमदा कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकार २०२१ पासून प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या (PMKVY) स्किल इंडिया पायलट प्रकल्पांतर्गत काश्मीरच्या नमदा क्राफ्टचे यशस्वीपणे पुनरुज्जीवन केले जात आहे. काश्मीरमधील सहा जिल्ह्यांतील सुमारे २२०० उमेदवारांनी या कलाप्रकाराचे प्रशिक्षण दिले जात आहे. 

काय आहे नमदा बनवण्याची प्रक्रिया
गालिचा ही कलात्मक विणकामाची एक प्राचीन कला आहे. त्यात प्रचंड विविधता आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे नमदा. ‘नमदा’लाच बुर्णूस असेही म्हणतात. नमदा हा काश्मिरी गालीचेचा एक पारंपारिक प्रकार आहे. मेंढ्याच्या लोकरीपासून हा गालीचा तयार केला जातो. या लोकरीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लोकर विणलेली नसते. त्यावर रंगीबेरंगी भरतकामही केले जाते. 

नमदा बनवणे म्हणजे विणकाम नव्हे. ते बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आणि मेहनतीची असते. पहिल्यांदा लोकर साबणाने धुतली जाते. त्यामुळे लोकरीचे तंतू एकमेकांत अडकून घट्ट होतात. त्यानंतर ही लोकर सपाट पृष्ठभागावर पसरवली जाते. त्यावर लोकरीचे थर रचले जातात.  आता लोकरीचे हे थर पाण्यात भिजवले जातात. त्यानंतर पिंजर नावाच्या यंत्राने हा लोकरीचा थर दाबला जातो. आता ही लोकर सुकण्यासाठी चटई किंवा दुसऱ्या वस्तूमध्ये गुंडाळून ठेवली जाते. मग या तयार गालिच्यावर दोन वेगवेगळ्या पद्धतीने नक्षीकाम केले जाते. 

काय आहे नमदाचा इतिहास 
काश्मीरला सुफी संताची मोठी परंपरा लाभाली आहे. शाह-ए-हमदान हे त्यापैकीच एक महत्त्वाचे सुफी संत होते. ते विणकाम करायचे. त्यांनीच ‘नमदा’ गालीचाची पद्धती विकसित केली आणि तिचा प्रचार प्रसारही केला. त्यांच्या अनेक शिष्यांनी ही कला अवगत केली. मात्र कालांतराने या कलेला उतरती कळा लागली. पुढे सोळाव्या शतकामध्ये मुघल सम्राट अकबराच्या काळात नुबी नावाच्या एका काश्मिरी व्यक्तीने सैन्यातील घोड्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी अकबराला नमदा भेट दिला. गालीचाच्या या प्रकारावर अकबर खूप प्रभावित झाला आणि त्याने काश्मीरमधील नमदा विणकरांना मोठ्या प्रमाणात जमीन दान दिली. या काळात घोड्याचे खोगीर हे नमद्याचेच बनलेले असत.