अब्दुल करीम खां (१८७२-१९३७) हे किराणा घराण्यातील श्रेष्ठ गायक होते. कुरुक्षेत्राजवळ किराणा हे गाव आहे. त्या गावचे म्हणून ते किराणा घराण्याचे मानले गेले. या घराण्याचे मूळ पुरुष नायक धोंडू व नायक भन्नु हे होत. त्यापैकी नायक धोंडू यांनी वृंदावनात जाऊन श्रीकृष्णाची तपश्चर्या केली व त्याच्या मुरलीचा मधुर षडज आपल्या कंठात धारण केला. ते गाऊ लागले की त्या परिसरातील गाई-वासरे मंत्रमुग्ध होत अशी ख्याती आहे.
या गायक धोंडूचे पणतू दिल्ली दरबारचे गायक होते. याच घराण्यातून अब्दुल वाहीद खां हे संगीतकार पुढे आले. नंतरच्या पिढीत काले खां आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे अब्दुल करीम खां. त्यांचे शिक्षण वडील काले खां व चुलते अब्दुल्ला खान यांच्याकडे झाले. रात्रंदिवस रियाज करून त्यांनी संगीतकलेत प्राविण्य मिळवले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते देशभ्रमण करण्यासाठी बाहेर पडले. कालांतराने बडोदा स्टेट मध्ये ‘स्टेट गायक’ म्हणून ते रुजू झाले.
पुढे बडोद्याची नोकरी सोडून ते मिरजला आले. मिरजेत त्यांनात्यांना प्लेगने पछाडले. पण एका फकीराने त्यांना मिरजेच्या दर्ग्यात जाऊन तेथे हजेरी द्या असे सांगितले. आजारपणातही ते दर्ग्यात गेले व गाणे गाऊन सेवा करू लागले. थोड्याच वेळा त्यांना तरतरी वाटली आणि साथीच्या रोगातून दोन-चार दिवसातच ते बरे झाले. तेव्हापासून ते उरुसाला मिरजेत येत आणि दर्ग्यावर हजेरी देत. ही परंपरा त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांच्यानंतर त्यांच्या शिष्यांनी आणि चाहात्यांनी ही परंपरा पुढे सुरु ठेवली.
आयुष्यभर स्वर साधना आणि प्रवास
अब्दुल करीम खां साहेबांचा आवाज सुरेल सनईप्रमाणे गोड. त्यांनी आयुष्यभर स्वरसाधना केली आणि कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अखंड भ्रमंती करून आपल्या जलसाने त्यांनी सारा भारत मंत्रमुग्ध करून सोडला. स्वरावर त्यांनी चांगला ताबा मिळवला होता. एक तंबोरा ते स्वरात लावीत व त्यानंतर गवसणीत बंद करून ठेवून देत. बऱ्याच वेळ गेल्यानंतर दुसरा तंबोरा लावीत आणि गवसणीत ठेवलेला तंबोरा काढून तो वाजवायला लावत. दोन्ही तंबोरे थोडाही फरक न दाखवता एका सुरात वाजत अशी आठवण जाणकार सांगतात. आपल्या गळ्यातून ते २२ श्रुती लावून दाखवत. अशी अचाट किमया या संगीतकाराने केली होती. स्वराच्या साक्षात्कारासाठी त्यांनी अखंड साधना केली आणि स्वरसिद्धी प्राप्त करून घेतली.
‘ओम तोम’ असे संगीतात म्हटले जाते ती ईश्वर प्राप्तीची ध्यानधारणा होय, असे खान साहेब नेहमी म्हणत. मुस्लिम असूनही हिंदू देवतांबद्दल त्यांना पराकोटीचा आदर होता. नृसिंहवाडीला श्री दत्ताच्या देवालयात ते आपल्या गाण्याच्या बैठकी करीत आणि दत्तप्रभूला आळवीत. संगीताच्या क्षेत्रात सर्व धर्म, सर्व देव हे एकच आहेत अशी त्यांची भावना होती. मुंबईत असताना कोण्या एका दुष्ट व्यक्तीने त्यांना शेंदूर खायला घातला. त्याचा परिणाम त्यांच्या आवाजावर झाला. कोणत्याही उपायाने आवाज सुधारणा. कर्नाटकातील बदामी गावाजवळ डोंगरातील देवापुढे जाण्यास त्यांना कोणीतरी सांगितले. खां साहेबांनी तोही प्रयोग केला. तेव्हा देवापुढे जात असताना एका धनगराने त्यांना काही औषधी दिली आणि त्यामुळे त्यांचासुधारला अशी माहिती त्यांचे शिष्य सांगतात.
महाराष्ट्रातील अनेक थोर मंडळींशी त्यांचे आपुलकीच्या संबंध होते. आपल्या स्वरज्ञानाने त्यांनी ही आपुलकी मिळवली होती. योगी अरविंद बाबू यांना खां साहेबांचे गाणे ऐकण्याचे इच्छा होती. त्यासाठी ते मिरजहून पॉंडिचेरीला जायला निघाले. चेन्नईपासून ५० किलोमीटरवर ‘सिंगा पेरूमल कोइलम’ स्टेशनवर प्रकृती बिघडल्याने त्यांना उतरावे लागले. त्यांचे शिष्य पुरुषोत्तम सोनी व चांदसाहेब सतारमेकर असे दोघेजण त्यांच्यासोबत होते. २७ ऑक्टोबर १९६१ रोजी याच स्टेशनवर खास साहेबांचे प्राणज्योत मालवली. ही हकीकत सांगताना पुरुषोत्तम सोनी म्हणतात, “खां साहेबांची प्राणज्योत मालवली त्या स्टेशनचे नाव ‘हिंदू मा कोयल’ म्हणजेच नामांकित गवयाचे स्थान असे होते. किती हा लक्षणे योगायोग. त्यांनी आम्हाला त्रास होत असल्याचे सांगितल्यामुळे आम्ही स्टेशन उतरलो. साहेब धार्मिक वृत्तीचे होते. इस्लामी मान्यतेप्रमाणे त्यांनी आपले तोंड पश्चिम दिशेकडे केले व सुरेल संगीताच्या सजावटीत ते कलमा पढू लागले. आणि क्षणार्धात संगीताची ही सनई कायमची बंद झाली.”
खां साहेबांना कोणतेही व्यसन नव्हते. एकदा फॉरेस्ट ऑफिसरकडे जेवताना त्याने खां साहेबांपुढे दारूचा ग्लास धरला. ते नको म्हणाले. तेवढ्यात दारूचे दोन थेंब त्यांच्या कपड्यावर पडले. घरी गेल्यावर खां साहेबांनी ते कपडे धुण्यास टाकले. ईश्वरावर त्यांची भक्ती होती. सांगलीला गणपतीपुळे, इचलकरंजीला नवरात्र उत्सवात, रामेश्वरजवळ नागौर शरीफ द्र्गात ते दरसाल बैठकीला जात असत. फकिरांना ते मदत करत असत. खां साहेब एकदा निवांत बसले असता एक जण तुणतुणे वाजवत त्यांच्यासमोर आला. त्याच्या वाजवण्यावर ते खुश झाले व काय पाहिजे ते मागे असे म्हणताच त्याने साहेबांचे डोक्यावरची बाहिली म्हणजे फेटा त्यांना मागितला. क्षणाचाही विचार न करता साहेबांनी तो त्याला देऊन टाकला.
साहेबांचे शिष्य मोजकेच होते. सवाई गंधर्व, सुरेश बाबू माने, बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी, रोशन आरा बेगम, शंकरराव सरनाईक, भीमसेन जोशी असे दिग्गज त्यांचे शिष्य होते. खान साहेबांनी आपली विद्या आपल्या शिष्यांना दिली आणि ते अजरामर झाले. संगीताने श्रोत्यांचे काळीज हलले पाहिजे. ते काम खां साहेबांच्या गाण्याने होई. ‘गोपाला मोरी करुणा कयो नही आवे’ हे भक्ती गीत ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असत.