रमजान विशेष : मुंबईसह लखनऊमधील महिला आता मस्जिदमध्ये अदा करू शकणार नमाज

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
मुंबईसह लखनऊ मधील मस्जिदमध्ये महिलांना नमाज अदा करता येणार
मुंबईसह लखनऊ मधील मस्जिदमध्ये महिलांना नमाज अदा करता येणार

 

- मलिक असगर हाशमी/ नईदिल्ली

- शाह ताज / मुंबई 

 

भारतात बहुतांश ठिकाणी महिलांना मस्जिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यास परवानगी नाही. मात्र गेल्या काही काळापासून याविरोधात प्रश्न उपस्थित केले जात होते. एके बाजुला ही चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे एक सकारात्मक बदल होताना दिसत आहे. रमजान महिना मुस्लिमांमध्ये पवित्र समजला जातो. या महिन्यात उपवास आणि नमाज अदा करण्यावर विशेष भर दिला जातो. रमजान महिन्यात, तरावीहच्या रूपात रात्रीच्या ईशाच्या नमाजानंतर लगेचच आठ आणि २० रकात विशेष नमाजचे अदा केले जाते. भारतातील पारंपारिक पद्धतीनुसार यावेळी पुरुष मस्जिदीत तर महिला घरी नमाज अदा करतात.

 

मात्र शुक्रवार २४ मार्चपासून सुरु होणाऱ्या रमजानपासून या परंपरेला छेद दिला जाणार आहे. त्यामुळे लखनऊ आणि मुंबईच्या काही मस्जिदींमध्ये आता मोठा बदल पाहायला मिळणार आहे. देशातील या दोन मोठ्या शहरांतील काही मस्जिदींमध्ये पुरुषांसोबतच महिलाही मस्जिदीत तरावीहची नमाज अदा करताना दिसतील. या वेळी पहिल्यांदाच लखनऊच्या ऐशबाग इदगाहमध्ये महिलांना तरावीहची नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

इदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फरंगी महाली यांनी सांगितले की, मस्जिदीचा एक भाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे जेणेकरून त्यारमजानमध्ये एकत्रितपणे तरावीहची नमाज अदा करू शकतील. यावेळी महिलांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था केल्याचे मौलाना फरंगी महाली यांनी सांगितले.

 

तरावीहची नमाज फक्त पुरूषांसाठीच असं बऱ्याच महिलांचा समज आहे. परंतु इस्लामी न्यायशास्त्रानुसार स्त्रियादेखीलही ही नमाज अदा करू शकतात. मशिदीचे दरवाजे महिलांसाठी नेहमीच खुले होते आणि पुढेही राहतील, असे काही उलेमांचे म्हणणे आहे. लखनऊ येथील ईदगाह ऐशबाग येथे महिलांसाठी तरावीहची नमाज अदा करण्यासाठी करण्यात आलेल्या या विशेष व्यवस्थेचे मुस्लिम महिलांनी स्वागत केले आहे.

 

या कृतीमुळे महिलांना समानतेची वागणूक तर मिळेलच, पण प्रार्थनेसाठी विशेष वातावरणही मिळेल, असे एका शाळेतील शिक्षिका फातिमा असद यांनी सांगितले. इदगाहमध्ये स्वच्छता आणि पडद्याची योग्य व्यवस्था असल्याने महिला तेथे आरामात नमाज अदा  करू शकतील. अनेक मुस्लिम देशांमध्ये ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता लखनऊमध्ये ही महिलांना हा अधिकार मिळाल्याचा मला आनंद आहे, असेही फातिमा म्हणाल्या.

 

आणखी एक सकारात्मक पाऊल

या रमजानमध्ये मुंबईतील जामा (मोठ्या) मस्जिदीतही अशाच स्वरुपाची व्यवस्था करण्यात आली आहे. काही काळापूर्वी क्रॉफर्ड मार्केट, भिंडीबाजार येथे असलेल्या जामा मस्जिदमध्ये महिलांसाठी विशेषव्यवस्था करण्यात आली होती. तिथे वजूची (नमाज अदा  करण्यापूर्वी हात-पाय-तोंडधुण्याची प्रक्रिया) व्यवस्था ही करण्यात आली आहे.

 

जामा मशीद मुंबईचे अध्यक्ष शोएब खतीब म्हणाले, ‘पहिल्यांदाच महिलांना मस्जिदीत तरावीहची नमाज अदा करता येणार आहे. मोठ्या संख्येने महिला मस्जिदीत नमाज अदा करण्यासाठी येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

 

ते पुढे म्हणाले,पुरुषांचाआणि महिलांचा येण्या-जाण्याचा मार्ग वेगळा असल्याने कोणाचीही गैरसोय होणार नाही. शिवाय येथे येणाऱ्या प्रत्येकासाठी पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध असतील याची काळजी मस्जिद व्यवस्थापन घेत असते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. महिलांसाठी नमाजची व्यवस्था करण्याच्या निर्णयाचे होणारे कौतुक पाहून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे मस्जिद व्यवस्थापनाने या निर्णयाची उत्साहाने अंमलबजावणी केली. 

 

रमजानची अनमोल भेट

तरावीहची नमाज अदा करण्याची व्यवस्था रमजानची अनमोल भेट असल्याचे एका महिलेने म्हटले. आता संपूर्ण रमजानमध्ये तरावीह अदा करण्यासाठी रोज मस्जिदीत येईल, असा आनंदही तिने व्यक्त केला.

 

नवी सुरुवात

महिलांच्या मस्जिद प्रवेशाबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. पण मुंबईच्या जामामस्जिदच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भिंडीबाजारातील एका दुकानात काम करणाऱ्या महिलेने सांगितले की, मशिदीमध्ये आमच्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करणाऱ्या मस्जिद व्यवस्थापनाचे जितके आभार मानावे तितके कमी आहे.  

 

त्या पुढे म्हणाल्या,आता आम्ही मस्जिदमध्ये जाऊन तरावीहची नमाज अदा करू आणि अधिकाधिक पुण्य कमावू. मस्जिदपासून जवळच राहणारी एक महिला म्हणते,आता मी दररोज पहिल्या रांगेत नमाज अदा करण्याचा प्रयत्न करेल.  

 

तरावीहच्या स्वागताची तयारी पूर्ण

शोएब खतीब म्हणतात, आता महिला कोणत्याही त्रासाशिवाय,खास मार्गाने मस्जिदीत पोहोचतील,वज़ू करतीलआणि सामुदायिक पद्धतीने तरावीह अदा करू शकतील. त्या ठिकाणी माईक, स्पीकर व इतर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. महिला मोठ्या संख्येने मस्जिदमध्ये पोहोचतील अशी अशी आम्हाला आशा आहे. मस्जिद व्यवस्थापनही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

 

(अनुवाद: पूजा नायक)