पाकिस्तानात खेळले जाणार आशिया कप

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
PCBच्या पदरी निराशाच!
PCBच्या पदरी निराशाच!

 

आशिया चषक पाकिस्तानातच होणार... भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही, तर आम्हीही विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही.... पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सातत्याने भारताला अशा प्रकारच्या धमक्या देत होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शरणागती पत्करली आणि सांगितले की भारताला पाकिस्तानमध्ये येण्याची गरज नाही आणि त्यांचे सामने तटस्थ ठिकाणीच होतील. पण इथे प्रश्न असा आहे की आशिया कपची फायनल कुठे होणार?

आशिया चषक 2023 सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचे ठिकाण काय असेल, हा प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात मोठा प्रश्न आहे. आशिया चषक पाकिस्तानातच होणार हे निश्चित, पण आता टीम इंडिया पाकिस्तान नव्हे तर दुसऱ्या देशात खेळणार हेही स्पष्ट झाले आहे.

टीम इंडिया जर आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचली तर पीसीबीचा मोठा अपमान निश्चित आहे. भारत आपले सामने पाकिस्तानबाहेर खेळू शकतो, असे पीसीबीने मान्य केले आहे. तर इतर संघ पाकिस्तानमध्ये आशिया कपचे सामने खेळणार आहेत. पण टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर पाकिस्तानला घरच्या मैदानावर विजेतेपदाचा सामना आयोजित करता येणार नाही.
 
जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि त्यासोबत पाकिस्तानी संघानेही फायनलमध्ये प्रवेश केला तर पीसीबीसाठी ती आणखी अपमानाची बाब असेल. कारण आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडेच असेल असे म्हणायचे असले तरी भारत-पाक अंतिम सामना झाल्यास या संघाला जेतेपदाचा सामना तटस्थ ठिकाणीच खेळावा लागणार आहे.

भारत सामना कुठे खेळणार?
आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट संघ आपले सामने कुठे खेळणार या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघाचे आशिया कपचे सामने यूएई, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड यापैकी एका देशात आयोजित केले जाऊ शकतात. उर्वरित संघ पाकिस्तानमध्येच सामने खेळतील. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हे सामने कोणत्या देशात होणार हे पाहण्यासारखे आहे.