पाकिस्तानच्या १६ वर्षांच्या गोलंदाजाने घडवला इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 d ago
फरहान अहमद
फरहान अहमद

 

इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत १६ वर्षांच्या खेळाडूने मोठा कारनामा करुन दाखवला आहे. काऊंटी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात सरे आणि नॉटींघमशायर हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फरहान अहमद या युवा खेळाडूने कसोटी क्रिकेटमधील १५९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

फरहान अहमदने मोडून काढला सर्वात मोठा रेकॉर्ड
काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत फरहान अहमद नॉटींघमशायर संघाकडून खेळतोय. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने १० गडी बाद केले आहेत. यादरम्यान पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ७ गडी बाद केले.

तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. या शानदार कामगिरीसह त्याने १५९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. फरहानने हा कारनामा वय १६ वर्ष १९१ दिवस असताना करुन दाखवला आहे.

यापूर्वी हा रेकॉर्ड ग्रेसच्या नावावर होता. ग्रेसने १८६५ मध्ये जेंटलमन ऑफ द साऊथसाठी खेळताना ८४ धावा खर्च करत १३ गडी बाद केले होते. त्यावेळी या खेळाडूचं वय १६ वर्ष ३४० दिवस इतकं होतं. आता फरहानने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इतिहास घडवणारा फरहान अहमद हा इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज रेहान अहमदचा भाऊ आहे. फरहान अहमद हा फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या फिरणाऱ्या चेंडूंवर विरोधी संघातील फलंदाज नागिण डान्स करताना दिसून आले.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सरे संघाने ५२५ धावांचा डोंगर उभारला. या संघाकडून रोरी बर्न्स आणि साई सुदर्शन यांनी शतकं झळकावली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नॉटींघमशायर संघाचा डाव ४०५ धावांवर आटोपला.

सरेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला, त्यावेळी या संघाने १७७ धावा करत डाव घोषित केला. नॉटींघमशायर संघाला हा सामना जिंकण्यासाठी २९८ धावांचं आव्हान होतं. हा सामना ड्रॉ राहिला.