नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर डी. गुकेश
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याच्यावर विजय मिळवणाऱ्या भारताच्या डी. गुकेश याने सोमवारी झालेल्या लढतीत भारताच्याच अर्जुन प्रोगेसी याच्यावर विजय मिळवला. या विजयासह गुकेश याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत ११.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. फॅबियानो कारुआना १२.५ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मॅग्नस कार्लसन ११ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
डी. गुकेश-अर्जुन एरोगेसी या भारतीय खेळाडूंमधील लढत लक्षवेधी ठरली. गुकेश पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळला. एरीगेसी काळ्या मोहऱ्यांसह लढला. एरीगेसी याने या लढतीत सुरुवातीला छान खेळ केला. तीन तासांपेक्षा अधिक काळ गुकेश बॅकफूटवर होता; पण दबावाखाली गुकेश याने खेळ उंचावला आणि यश संपादन केले. गुकेश याप्रसंगी म्हणाला, की अर्जुनविरुद्धच्या लढतीत माझ्याकडून छान खेळ होत नव्हता. तरीही मी चाली करीत राहिलो. पुढे काही बाबी मनाजोगत्या घडल्या. गुकेशने या विजयाचे तीन गुष्ण वसूल केले. एरीगेसीला एकही गुण मिळाला नाही.
प्रशिक्षकांकडून कौतुक
डी. गुकेश याचे मुख्य प्रशिक्षक ग्रेझेगोर्झ गाजेवस्की यांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले. ते म्हणाले, गुकेश याला आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही; पण त्याने अर्जुनला कडवी लढत दिली. गुकेशला याचे फळ विजयाच्या रूपात मिळाले.
कारुआनाकडून वेई यीचा पराभव
फॅबियानो कारुआना याने वेई यी याच्यावर सातव्या फेरीत विजय मिळवला. यामुळे कारुआना याला १२.५ गुणांसह पहिले स्थान पटकावता आले. वेई यी ६.५ गुणांसह अखेरच्या स्थानावर आहे. मॅग्नस कार्लसन याने हिकारु नाकामुरा याला अर्मागेडॉनमध्ये पराभूत केले. कार्लसनकडे ११ गुण असून तो तिसऱ्या स्थानावर आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter