१९ वर्षांखालील विश्वचषक : भारताचा पाकिस्तानवर ५८ धावांनी दणदणीत विजय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. सोमवारी झालेल्या सुपर सिक्स फेरीतील सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५८ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत सर्वबाद २५२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४६.२ षटकांत १९४ धावांत गारद झाला. आता भारताचा सामना बुधवारी हरारे येथे पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानशी होईल.

भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि फिरकीपटू खीलान पटेल यांनी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. दोघांनीही प्रत्येकी ३ बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी हे २-५३ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडपेक्षा चांगला नेट रन रेट राखण्यासाठी ३३.३ षटकांत पूर्ण करणे अनिवार्य होते. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर पाकिस्तानचा हा प्रयत्न फसला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

तत्पूर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताची सुरुवात खराब झाली आणि कर्णधार आयुष म्हात्रे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि अ‍ॅरॉन जॉर्ज यांनी संयमाने खेळत ४७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या वेदांत त्रिवेदीने ९८ चेंडूंत ६८ धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. तळाच्या फलंदाजांनीही मोलाची भर घातली. कनिष्क चौहान आणि खीलान पटेल यांनी आठव्या विकेटसाठी ५० धावांची वेगवान भागीदारी केली. यामुळे भारताला २५० धावांचा टप्पा ओलांडता आला.

पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज अब्दुल सुभानने १० षटकांत ३३ धावा देऊन ३ बळी घेतले. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात काहीशी आक्रमक झाली होती. उस्मान खान आणि हमजा जहूर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचली. परंतु, ३३.३ षटकांत सामना जिंकण्याच्या दडपणाखाली त्यांची फलंदाजी कोलमडली. १७ व्या षटकानंतर त्यांचा धावगतीचा वेग मंदावला. भारतीय फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये अचूक टप्प्यावर मारा करत धावांवर अंकुश लावला.

मोठ्या फटक्यांच्या नादात पाकिस्तानने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. उस्मान खान बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांनी शेवटच्या ५ विकेट्स अवघ्या २२ धावांत गमावल्या. अखेरीस खीलान पटेलने हुजेफा अहसानला त्रिफळाचीत करत भारताचा विजय निश्चित केला. या विजयासह भारत सुपर सिक्स फेरीत 'ग्रुप २' मध्ये अव्वल स्थानावर राहिला असून स्पर्धेत अपराजित आहे.