बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. भारतासोबत सुरू असलेल्या तणावाचा थेट फटका आता बांगलादेशच्या क्रिकेटला आणि खेळाडूंना बसू लागला आहे. एका प्रसिद्ध मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेश क्रिकेटला आणखी एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रायोजकाने माघार घेतल्यानंतर, आता भारतीय कंपन्यांनीही बांगलादेशच्या खेळाडूंना प्रायोजकत्व देण्याबाबत हात आखडता घेतला आहे.
भारतातील प्रसिद्ध क्रीडा साहित्य निर्माती कंपनी 'एसजी'ने बांगलादेशच्या बड्या खेळाडूंसोबतचे करार नूतनीकरण करण्यास नकार दिल्याचे समजते. या खेळाडूंमध्ये बांगलादेशचा कर्णधार लिटन दास, मोमिनुल हक आणि यासिर रब्बी यांच्यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. सध्याच्या राजकीय आणि क्रिकेट संबंधांमधील तणावामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 'एसजी'ने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, खेळाडूंच्या एजंट्सना याबद्दल कल्पना देण्यात आली आहे.
केवळ 'एसजी'च नाही, तर 'सरीन स्पोर्ट्स' या दुसऱ्या एका भारतीय कंपनीनेही कठोर पाऊल उचलले आहे. 'एसएस'ने बांगलादेशातून आपले क्रीडा साहित्य उत्पादित करणे थांबवल्याचे वृत्त आहे. बांगलादेशमधील अस्थिरता आणि भारतासोबतचे ताणले गेलेले संबंध यामुळे सप्लाय चेनवर परिणाम झाला आहे. यामुळे बांगलादेशच्या क्रीडा उद्योगाला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
या सर्व घडामोडींची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला बीसीसीआयच्या निर्देशानंतर संघातून मुक्त केले. त्यानंतर बीसीबीनेही मुस्तफिजुरला आयपीएल खेळण्यासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर, बीसीबीने सुरक्षेचे कारण देत २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील आपले सामने भारतात खेळण्यास नकार दिला असून, ते सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी आयसीसीकडे (ICC) केली आहे. या सततच्या तणावामुळे आता भारतीय कंपन्यांनी बांगलादेश क्रिकेटपासून लांब राहणे पसंत केले आहे.