रमजान काळात त्रिशूरच्या मंदिर परिसरात घडली 'रिअल केरळ स्टोरी'

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
झैनुद्दीन
झैनुद्दीन

 

केरळ, 

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील धार्मिक सलोख्याचा एक अतिशय सुंदर उदाहरण पाहायला मिळाले आहे. त्रिशूरच्या वेंगिडंगू येथील पाडूर पुथुकावु मंदिराच्या एका उत्सवात अक्करमेल शेखरन नावाच्या हत्तीसोबत त्याचे माहूत झैनुद्दीन आले होते. तामरसेरी येथील रहिवासी असलेल्या झैनुद्दीन यांचा मंदिर परिसरात रोजा सोडतानाचा व्हिडिओ सध्या संपूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ही घटना म्हणजे केरळमधील सामाजिक सलोख्याचे जिवंत उदाहरण मानले जात आहे.

या प्रसंगाबाबत झैनुद्दीन यांनी एका मुलाखतीत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, "मंदिरात रात्री ९ वाजता कार्यक्रम होता. हत्तीला आवरत असतानाच अझान झाली आणि तीच माझा रोजा सोडण्याची वेळ होती. नेमका तोच प्रसंग कोणीतरी व्हिडिओमध्ये टिपला". 

इफ्तारच्या वेळी मंदिर समितीने त्यांना जेवणाबद्दल विचारले असता झैनुद्दीन यांनी आपला उपवास असल्याचे सांगितले. त्यावर समिती सदस्यांनी त्यांच्या इफ्तारची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. याबाबत झैनुद्दीन सांगतात कि, "मंदिर समितीच्या सदस्यांनी इफ्तारची व्यवस्था करू असे सांगितले. परंतु मी त्यांना म्हणालो की नका त्रास घेऊ, मी बघतो काय ते. पण आसपास पाहिले तर सर्व दुकाने बंद होती. माझ्या मनात विचार आला की आता कोणीतरी मदतीला येईल तर बरे होईल, आणि त्याच क्षणी समितीचे एक सदस्य फळे आणि ज्यूस घेऊन आले."

मदत करणारे मंदिर समितीचे सदस्य त्यांचा देखील उपवास होता. त्यांनी झैनुद्दीन यांना आपल्या घरी इफ्तारसाठी बोलावले होते. मात्र, हत्तीला सोडून येणे झैनुद्दीन यांना शक्य नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन त्या सदस्याने स्वतः जेवणाचे पाकीट घेऊन त्याठिकाणी पोहोचले. ही घटना सर्वांसाठी माणुसकीचे एक उत्तम उदाहरण असून केरळच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन यातून घडले.

केरळ कायमच धार्मिक सलोख्याचे केंद्र राहिले आहे. याठिकाणी अशाप्रकारच्या अनेक घटना घडत असतात. त्रिशूरच्या वेंगिडंगू येथील पाडूर पुथुकावु मंदिरातील ही तेथील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. 

ही घटना आजच्या काळात संपूर्ण देशासाठी एक दिशादर्शक दीपस्तंभ ठरली आहे. जात आणि धर्माच्या भिंती ओलांडून एकमेकांच्या सुख-दु:खात आणि सणावारांत सहभागी होणे, हीच खऱ्या केरळची संस्कृती आहे. हीच 'रिअल केरळ स्टोरी' असल्याचे यातून दिसून येते. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter