भारतीय क्रिकेटमधील 'रन मशीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरफराज खानने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नवी क्रांती घडवली आहे. गुरुवारी (८ जानेवारी २०२६) विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध खेळताना मुंबईच्या या फलंदाजाने अवघ्या १५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून 'लिस्ट-ए' (५० षटके) क्रिकेटमधील भारतातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावावर केला.
या खेळीदरम्यान सरफराजने भारतीय टी-२० संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर अक्षरशः प्रहार केला. त्याने अभिषेकच्या एकाच षटकात ३ षटकार आणि ३ चौकार मारून ३० धावा वसूल केल्या. या धडाकेबाज खेळीने जयपूरच्या मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
सरफराज खानने १५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत ३१ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला. यापूर्वी हा विक्रम महाराष्ट्राच्या अभिजीत काळे यांच्या नावावर होता, ज्यांनी १९९५ मध्ये १६ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. तसेच २०२१ मध्ये बडोद्याच्या अतीत सेठनेही १६ चेंडूंत हा पराक्रम केला होता. आता १५ चेंडूंत अर्धशतक झळकावून सरफराज हा 'लिस्ट-ए' क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज बनला आहे. जागतिक स्तरावर हे चौथे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे.
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २१६ धावा केल्या होत्या. २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सरफराजने खेळाचे चित्र बदलून टाकले. त्याने अवघ्या २० चेंडूंत ६२ धावांची झंझावाती खेळी केली, ज्यात ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
सरफराज बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ४५ धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या टोकाकडून सूर्यकुमार यादव (१५), शिवम दुबे (१२) आणि हार्दिक तामोर (१५) स्वस्तात बाद झाले. विजयासाठी केवळ ४ धावा हव्या असताना आणि ४ विकेट हातात असताना मुंबईचा डाव घसरला आणि संपूर्ण संघ २१५ धावांवर गारद झाला. या ऐतिहासिक खेळीनंतरही मुंबईला केवळ एका धावेने पराभव पत्करावा लागला.
सरफराज खान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने चालू स्पर्धेत एका सामन्यात १५७ धावांची खेळीही केली होती. अलीकडेच झालेल्या आयपीएल २०२६ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला ७५ लाख रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले आहे. धोनीच्या मार्गदर्शनाखाली सरफराजची ही 'फायर' कामगिरी आयपीएलमध्ये काय कमाल करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -