भारताचे सात्विक-चिरागचा बॅडमिंटनमध्ये अव्वलस्थानी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 2 Months ago
बॅडमिंटनपटू सात्विक आणि चिराग
बॅडमिंटनपटू सात्विक आणि चिराग

 

भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गेल्या काही वर्षात मोठे यश मिळवले आहे. आता त्यांची जोडी सध्या शानदार फॉर्ममध्येही आहे. नुकतेच त्यांनी आता जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुरुष दुहेरीमध्ये पुन्हा एकदा अव्वल क्रमांक मिळवला आहे.

त्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये अव्वल क्रमांकावर हक्क सांगितला होता. परंतु, नंतर त्यांची क्रमवारी घसरली होती. सात्विकच्या दुखापतीमुळेही त्यांना काही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

पण त्यांनी थायलंड ओपन 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकत पुन्हा एकदा क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्यांची बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारी पहिलीच भारतीय जोडी आहे.

थायलंड ओपनमधील पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी चीनची जोडी चॅन बो यँग आणि लियू यी यांचा पराभव केला.चिराग - सात्विकने चीनच्या जोडीला 21-15, 21-15 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले होते. यासह त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली होती.

या विजेतेपदानंतर त्यांना क्रमवारीत फायदा झाला आणि त्यांनी दोन स्थानांची प्रगती करत अव्वल क्रमांक पटकावला. त्यांचे आता 99,670 पाँइंट्स झाले आहेत.

या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर लियांग वेई केंग-वँग चँग ही चीनची जोडी असून त्यांचे 99, 618 पाँइंट्स आहेत, तर तिसऱ्या क्रमांकार कोरियाची जोडी कँग मिन ह्युक - सेओ सेउंग जी ही जोडी असून त्यांचे 98,015 पाँइंट्स आहेत.

या बॅडमिंटन क्रमवारीत पुरुष एकेरीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये भारताचा एकमेव खेळाडू एच एस प्रणॉय आहे. तो 9 व्या क्रमांकावर आहे. महिला एकेरीत पहिल्या 10 मध्ये एकही भारताची खेळाडू नाही. भारताची दोनवेळची ऑलिम्पिक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू 15 व्या क्रमांकावर आहे.

महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारताची कोणतीही जोडी अव्वल 10 मध्ये नाही. पण असे असले तरी महिला दुहेरीत भारताची तिनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पाने प्रगती केली आहे. त्यांची जोडी 19 व्या क्रमांकावर आली आहे.