२००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलचा १६वा हंगाम ३१ मार्चपासून सुरू झाला. त्यातील तिसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुध्दच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या खलील अहमदने ऐतिहासिक विक्रम केला. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान ५० विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने फक्त ३५ सामन्यांमध्ये ५० आयपीएल विकेट्स मिळवण्याची किमया केली आहे. या कामगिरीमुळे तो अचानक प्रसिद्धी झोतात आला असला तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास मात्र अत्यंत खडतर राहिला आहे.
खलीलचे बालपण फार कठीण गेले. त्याचे वडील कंपाउंडर होते. आपल्याप्रमाणेच मुलाचेही आयुष्यही आर्थिक ओढाताणीत जाऊ नये यासाठी ते कमालीचे आग्रही होते. त्यामुळे मुलाने शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, असे त्यांना वाटायचे. घरासाठी लागणारे रेशन आणि इतर साहित्य आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असायची. मात्र, खलीलचा ओढा क्रिकेटकडे असल्याने घरातील काम आणि अभ्यासाकडे त्यांचे फारसे लक्ष नसायचे. त्यामुळे वडील घरी आले की आई खलीलची तक्रार करायची, त्यामुळे खलीलला त्यांचा सर्रास मारही खावा लागायचा.
खलीलला तीन बहिणी. तिन्ही मोठ्या. त्या खलीलला वडिलांच्या मारापासून वाचवत असत. वडिलांचा मार पचवत खलीलने क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले. पुढे तो क्रिकेटमध्ये चमकू लागला. त्याचे नाव व्हायला लागले. तेव्हा वडिलांनीही त्याला साथ दिली. त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला सांगितले. त्याला आश्वस्त करत ते म्हणाले, ‘बेटा तू मनापासून खेळ. मी माझ्या पेन्शनने घर चालवतो. तू मात्र क्रिकेट सोडू नकोस.’ वडिलांकडून पूर्ण पाठींबा मिळाल्यामुळे खलीलने अधिक गांभीर्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अखेर कष्टाला फळ आले. राजस्थान संघात त्याची निवड झाली. आणि पुढे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये सहभागी झाला.
मात्र मोजक्या सामन्यांनंतर खलीलला भारतीय संघातून डच्चू मिळाला. आता आयपीएलमधील या ताज्या विक्रमामुळे टीम इंडियात स्थान मिळवण्याची संधी त्याच्याकडे चालून आली आहे. पंचवीस वर्षीय खलील आपली लाईन-लेन्थ सुधारत कामगिरीत सातत्य आणून टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करू शकतो. सध्या भारतीय संघत एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नसल्यामुळे डावखुऱ्या खलीलसाठी हा दुग्धशर्करा योग ठरणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात पुनर्प्रवेश करण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे.
आयपीएलमध्ये वेगवान ५० विकेट्स घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरलेला खलील ही कामगिरी करणारा जगातला पाचवा गोलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगाने ५० विकेट्स घेण्याचा विक्रम कसिगो रबाडाच्या नावावर आहे. त्याने केवळ २७ सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेतल्या आहेत. सुनिल नरेनने ३२ सामन्यांत, लसिथ मलिंगाने ३३ तर इमरान ताहिरने ३५ सामन्यात ५० विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
काय आहे यावर्षीच्या आयपीएलमध्ये?
या आयपीएल २०२३ मध्ये चाहत्यांना एकूण ७४ सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. देशभरातील १२ मैदानांवर सामने रंगणार आहेत. स्पर्धेत सामील झालेल्या दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. अ गटामध्ये मुंबई, राजस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.