मोहम्मद सिराज : ऑटोचालकाचा मुलगा ते क्रिकेट हिरो

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 25 d ago
मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराज

 

भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल कसोटीत इंग्लंडवर शानदार विजय मिळवत कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. या विजयाचा खरा हिरो ठरला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. शेवटच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची गरज असताना सिराजने ३ बळी घेत सामना भारताच्या बाजूने फिरवला. या मालिकेत त्याने सर्वाधिक १८५.३ षटके टाकली आणि १११३ चेंडूत २३ बळी घेतले. सिराजच्या या कामगिरीने तो केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

'ऑटो चालवणाऱ्याचा मुलगा’ हा टोमणा त्याची ताकद
“जा, तुझ्या बापासारखा ऑटो चालव,” असा टोमणा मोहम्मद सिराजला अनेकदा ऐकावा लागला. पण या शब्दांनी त्याला कधीच खचवलं नाही. उलट, त्याने याच टोमण्यातून प्रेरणा घेतली. “माझ्या वडिलांचं काम माझ्यासाठी अपमान नाही, ती माझी ताकद आहे,” असं सिराजने नुकत्याच केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं होतं. त्याच्या वडिलांनी हैदराबादच्या रस्त्यांवर ऑटो चालवत कुटुंबाला सांभाळलं आणि मुलाला मोठी स्वप्न पाहण्याचं बळ दिलं. सिराज म्हणतो, “माझ्या वडिलांनी मला खऱ्या मेहनतीचं महत्त्व शिकवलं. डोकं खाली ठेवून काम करत राहा, लोक काहीही बोलू दे.”

प्रॅक्टिसनंतर पायी घरी, पण स्वप्नं कधीच थांबली नाहीत
सिराजचा प्रवास सोपा नव्हता. प्रॅक्टिसनंतर तासंतास पायी चालत घरी परतणं, इतर खेळत असताना बेंचवर बसून वाट पाहणं, कोणाचाही विश्वास नसताना स्वतःवर विश्वास ठेवणं. या सगळ्याने त्याला घडवलं. “प्रॅक्टिसनंतर पायी चालताना मला भूक काय असते हे कळलं. जेव्हा लोकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं, तेव्हा मी आणखी मेहनत केली,” असं सिराज सांगतो. त्याच्या या जिद्दीने आज तो भारताचा सर्वात विश्वासू वेगवान गोलंदाज बनला आहे.

‘कॅप’ ही मेहनतीची ग्वाही
सिराजने एका भावनिक पोस्टमध्ये आपल्या कुटुंबाचा जुना फोटो शेअर केला आणि लिहिलं, “माझी कॅप हे सिद्ध करते की तुम्ही ऑटोचालकाचे असा की सॉफ्टवेअर इंजिनिअरचे, मेहनतच तुम्हाला यश मिळवून देते.” हीच कॅप त्याने ओव्हलच्या मैदानात परिधान केली आणि भारताला विजय मिळवून दिला. शेवटच्या दिवशी त्याने घेतलेल्या ३ बळींनी इंग्लंडचा पराभव निश्चित केला आणि भारत मालिका गमावण्यापासून वाचला.

सोशल मीडियावर सिराजची जादू
सिराजच्या या प्रेरणादायी कहाणीने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. त्याच्या मेहनतीचे किस्से, त्याच्या वडिलांबद्दलचा आदर आणि त्याची साधी राहणी यामुळे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. “सिराजचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा आहे,” असं एका चाहत्याने ट्विट केलं. सिराजच्या या यशाने केवळ क्रिकेटप्रेमींचीच नाही, तर प्रत्येक मेहनती व्यक्तीची मनं जिंकली आहेत.

भारताचा नवा ‘स्पीड स्टार’
मोहम्मद सिराजने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने सिद्ध केलं की स्वप्नं कितीही मोठी असली, तरी मेहनत आणि आत्मविश्वासाने ती पूर्ण होऊ शकतात. हैदराबादच्या गल्लीतून आलेला हा मुलगा आज भारताचा क्रिकेट हिरो बनला आहे.