मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
महिला प्रीमियर लीग : जेतेपदाची लढत दिल्ली कॅपिटल्सशी
महिला प्रीमियर लीग : जेतेपदाची लढत दिल्ली कॅपिटल्सशी

 

नवी मुंबई : नॅट सिव्हर हिची अष्टपैलू चमक (नाबाद ७२ धावा व १/२१) आणि इसाबेल वाँग हिने हॅट्‌ट्रिकसह टिपलेले चार बळी याच जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एलिमिनेटर लढतीत यूपी वॉरियर्सवर ७२ धावांनी विजय मिळवला आणि महिला प्रीमियर लीग या टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता येत्या रविवारी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

मुंबईकडून यूपी वॉरियर्ससमोर १८३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मात्र त्यांचा डाव १७.४ षटकांत ११० धावांमध्येच गारद झाला. इसाबेल वाँग हिने १३व्या षटकांतील दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर किरण नवगिरे, सिमरन शेख व सोफी एक्लेस्टोन यांना बाद करीत हॅट्‌ट्रिक साजरी केली. तिने १५ धावा देत ४ फलंदाज बाद केले. यूपी वॉरियर्सकडून किरण नवगिरे हिने सर्वाधिक ४३ धावा केल्या.

दरम्यान, याआधी यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यास्तिका भाटीया व हेली मॅथ्यूज या मुंबईच्या सलामी जोडीने ३१ धावांची भागीदारी करीत आश्‍वासक सुरुवात करून दिली. अंजली सरवानी हिने यास्तिकाला २१ धावांवर बाद केले. त्यानंतर मॅथ्यूज व नॅट सिव्हर ही जोडी खेळपट्टीवर स्थिरावणार असे वाटत असतानाच पार्श्ववी चोप्रा हिने मॅथ्यूजला २६ धावांवर बाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही मोठी खेळी करता आली नाही. सोफी एक्लेस्टोन हिने तिला १४ धावांवर बाद केले.

महत्त्वाची भागीदारी
हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतर सिव्हर व अमेलिया केर या जोडीने ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सिव्हरने अवघ्या ३८ चेंडूंमध्ये ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७२ धावांची खेळी साकारत मुंबईला ४ बाद १८२ धावसंख्या उभारून दिली. अमेलिया हिने २९ धावांची खेळी करीत सिव्हरला उत्तम साथ दिली. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोन हिने ३९ धावा देत २ फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स २० षटकांत ४ बाद १८२ धावा (नॅट सिव्हर नाबाद ७२, अमेलिया केर २९, सोफी एक्लेस्टोन २/३९) विजयी वि. यूपी वॉरियर्स १७.४ षटकांत सर्व बाद ११० धावा (किरण नवगिरे ४३, इसाबेल वाँग ४/१५).