रणजीच्या अंतिम सामन्यात मुशीर खानचे विक्रमी शतक

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 1 Months ago
मुशीर खान
मुशीर खान

 

सर्फराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान याने रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावले. विदर्भाविरुद्धच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात मुशीर खानने शतक झळकावून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा २९ वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

मोठा भाऊ सर्फराज खान यांच्या पावलावर पाऊल ठेवत धाकटा भाऊ मुशीरनेही आपल्या नावाचा डंका गाजवत आहे. वयाच्या 19 व्या वर्षी रणजी ट्रॉफी फायनलमध्ये झंझावाती शतक झळकावून त्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला आपली क्षमता दाखवून दिली.

खरंतर, रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईचा सामना विदर्भ संघाशी आहे, ज्यामध्ये मंगळवारी मुंबई संघाचा युवा खेळाडू मुशीर खानने तुफानी शतक झळकावून इतिहास रचला. 255 चेंडूंचा सामना करत मुशीरने शतक झळकावले आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

सर्फराजचा भाऊ मुशीर खान याने वयाच्या 19 वर्षे 14 दिवसांत रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक झळकावले, तर सचिनने 21 वर्षे 10 महिन्यांत ही कामगिरी केली होती. त्यावेळी सचिनने 1994-94 च्या रणजी मोसमात पंजाबविरुद्ध द्विशतक झळकावले होते.

रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात विदर्भाविरुद्ध मुंबई संघाने पकड मजबूत केली आहे. पहिल्या डावाच्या जोरावर मुंबईने 119 धावांची आघाडी घेतली होती आणि त्यानंतर दुसऱ्या डावातही मुंबई संघाचे फलंदाज चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत.

खराब सुरुवातीनंतर मुशीर खान आणि कर्णधार अजिंक्यने संघाच्या डावाची धुरा सांभाळली. कर्णधार रहाणे 73 धावा करून बाद झाला. त्याचवेळी श्रेयस अय्यर 111 चेंडूंचा सामना करत 95 धावा करून बाद झाला. वृत्त लिहिपर्यंत मुशीर खान सध्या 129 धावांवर फलंदाजी करत आहे. मुंबईकडे 451 धावांची आघाडी आहे.

मुशीर खान विषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख

अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करणारा मुशीर खान