भारतीय संघाने ओव्हल मैदानावर अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. इंग्लंड संघाचे उरलेले चार फलंदाज बाद करून संपूर्ण डाव ३६७ धावांवर संपवण्यात यश आले. अविश्वसनीय असा सहा धावांनी विजय संपादन करता आला आहे. म्हणूनच ५३ चेंडू आणि अवघा ५६ मिनिटांचा पाचव्या कसोटी सामन्यातील थरार क्रिकेटमधला सर्वांत जास्त आनंद देणारा ठरला.
ओव्हल कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद करून मिळवलेला विजय कायम स्मरणात राहणार आहे. शुभमन गिलच्या संघाने मालिकेत केलेली २-२ बरोबरी क्रिकेट इतिहासात मांडली जाणार आहे. मोहम्मद सिराजला सामन्याचा मानकरी, तर शुभमन गिलला हॅरी ब्रुकसोबत मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले आहे.
पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होत असताना कमालीची हुरहुर दोन्ही संघातील खेळाडूंना आणि प्रेक्षकांना जाणवत होती. विजयासाठी लागणाऱ्या ३५ धावा किती सहज किंवा किती मोठ्या आहेत, हे क्रिकेटकडून समजून घ्यायचे होते. पहिल्याच षटकात ओव्हर्टनने दोन चौकारांसह १० धावा वसूल केल्या. लगेच इंग्लंडच्या प्रेक्षकांनी ओरडून प्रोत्साहन दिले.
भारतीय पाठीराख्यांच्या पोटात कालवाकालव व्हायला लागली. मनात विचार यायला लागला की प्रचंड कष्ट करून अथक मारा करणाऱ्या सिराजला क्रिकेट देव मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात तरी घवघवीत यश देणार का नाही. झाले तसेच. सिराजने प्रथम दडपणाखाली खचून गेलेल्या जेमी स्मिथला यष्टिरक्षकाकडे झेल द्यायला भाग पाडले. शेवटचा दिवस असून, ओव्हल मैदानावरचा थरार अनुभवायला भरघोस गर्दी करणाऱ्या भारतीय प्रेक्षकांनी मग घसे मोकळे केले.
सिराज तिथे थांबला नाही. त्याने ओव्हर्टनला सतत बाहेर जाणाऱ्या चेंडूनंतर अचानक आत येणारा चेंडू टाकून पायचित केले. प्रसिध कृष्णाने चांगला मारा करून दडपण कायम ठेवले होते. कृष्णाने जोश टंगच्या यष्ट्या हादरवून टाकणारा चेंडू टाकला. ओव्हल मैदानावरचे सगळे प्रेक्षक मग उभे राहून टाळ्या वाजवू लागले. कारण होते डावा खांदा निखळला असूनही ख्रिस वोक्स फलंदाजीसाठी येताना दिसला.
भारतीय कप्तानाने अॅटकिन्सनला मोठे फटके मारायचे आव्हान दिले. त्याचा एक कठीण झेल आकाशदीपने सोडला आणि सहा धावा इंग्लंडच्या खात्यात जमा झाल्या. एकदा जुरेलने शेवटच्या चेंडूवर उजव्या हातातील ग्लोव्ह काढून ठेवला नाही आणि त्याची फेक यष्टीला लागली नाही म्हणून वोक्स धावबाद होताना वाचला. भारतीय संघाने तरीही आत्मविश्वास कायम ठेवला. ज्या सिराजला क्रिकेट देवाने एक एक बळी मिळवायला त्रास दिला, परीक्षा बघितली, त्याच सिराजने गस अॅटकिन्सनच्या यष्टी भेदून भारताला सहा धावांनी विजय मिळवून दिला. भारतीय संघ आनंदाने बेभान झाला आणि सगळ्यांनी सिराजला कडकडून मिठी मारली.
नव्या चेहऱ्याच्या भारतीय संघाचा कसा निभाव लागणार, असा कयास असताना शुभमन गिलच्या शिलेदारांनी कमाल खेळ करताना संपूर्ण मालिकेत वरचढ खेळ केला. लॉर्ड्सचा सामना गमावल्यानंतर ओल्ड ट्रॅफर्डचा सामना अनिर्णित राखण्याची कमाल करून दाखवली. मालिका जिवंत ठेवली आणि शेवटच्या सामन्यात जोरदार पुनरागमन करताना सहा धावांनी विजय मिळवून दाखवला.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'विश्वास' या इमोजीने प्रेरणा - सिराज
एखादी छोटीशी कृती किंवा विचार कसा आमूलाग्र बदल घडवू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण मोहम्मद सिराजने दाखवून दिले. 'विश्वास' हा एक इमोजी त्याने मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि नंतर पाचव्या कसोटीत, पाचव्या दिवशी, इतिहास रचला. सामन्यात नऊ विकेट मिळवणाऱ्या सिराजला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
आपल्या या प्रेरणादायी कामगिरीसाठी कारणीभूत ठरलेल्या कृतीची माहिती देताना सिराज म्हणाला, "मी सकाळी उठल्यावर मोबाईलमध्ये गुगलवर ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा 'विश्वास' (बिलिव्ह) हा इमोजी शोधला आणि तो वॉलपेपर म्हणून ठेवला. त्यानंतर देशासाठी विजय मिळवून देण्याचा निर्धार केला."
"लॉर्ड्स येथील कसोटीत मी फलंदाज म्हणून अखेरपर्यंत लढत होतो, परंतु दुर्दैवाने तेथे संघाला विजय मिळवून देऊ शकलो नाही, मात्र येथे पाचव्या कसोटीत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिल्याचा फार मोठा आनंद आहे," असे सिराजने सांगितले.
"पूर्ण मालिकेत आम्ही प्रतिकार करण्याची एकही संधी सोडली नाही. प्रत्येक क्षणी आम्ही लढत होतो. अखेरीस मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. हे भारतीय कसोटी क्रिकेटचे भविष्य ठरेल," असे मत संघातील अनुभवी फलंदाज के. एल. राहुलने व्यक्त केले. राहुलने या मालिकेत दोन शतके झळकावली.