T20 World Cup : अमेरिकेने रचला इतिहास, सुपर ८मध्ये मिळवले स्थान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
युनायटेड स्टेट्स आणि आयर्लंड संघ
युनायटेड स्टेट्स आणि आयर्लंड संघ

 

टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये ग्रुप A मधील युनायटेड स्टेट्स आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आले आहेत. याचबरोबर युएसएने आपल्या पहिल्याच टी 20 वर्ल्डकपमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करत इतिहास रचला.

युएसए 5 गुणांसह सुपर 8 मध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संंपुष्टात आले आहे. पाकिस्तानने आता जरी आयर्लंडविरूद्धचा सामना जिंकला तरी ते सुपर 8 मध्ये प्रवेश करू शकणार नाहीये.

आजच्या युएसए विरूद्ध आयर्लंड सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. सामना सुरू होण्यापूर्वीच तुफान पाऊस पडल्यानं नाणेफेकीस उशीर झाला होता. काही काळाने पावसाने उसंत घेतली मात्र मैदानाचं रूपांतर तळ्यात झालं होतं. त्याचवेळी अंपायर्स सामना वॉश आऊट झाल्याची घोषणा करतील असं वाटलं होतं.

फोटो पाहून युएसए पहिल्याच टी 20 वर्ल्डकपमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करणार याची खात्री वाटू लागली. पाकिस्तानची गाशा ग्रुप स्टेजमध्ये गुंडाळला जाण्याचे हे संकेत होते. मात्र ग्राऊंड स्टाफने प्रयत्नांची पराकाष्ठा करत मैदान खेळण्यायोग्य करण्याचा प्रयत्न केला.

अंपायर्सनी देखील शेवटपर्यंत सामना होतो का नाही याची चाचपणी केली. मैदान बऱ्यापैकी वाळवण्यात आलं होतं. मात्र तेवढ्या पुन्हा पावसाला सुरूवात झाली अन् पाकिस्तानच्या पॅक अपवर शिक्कामोर्तब झालं.

अंपायर्सनी सामना पावसामुळे रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे युएसए आणि आयर्लंडला प्रत्येकी एक गुण देण्यात आला. याचबरोबर युएसएचे 5 गुण झाले अन् ते सुपर 8 साठी पात्र झाले.

दुसरीकडे पाकिस्तानने आपल्या तीन सामन्यापैकी एकच सामना जिंकला असल्याने त्यांचे दोन गुण झाले आहेत. आता ते आयर्लंडविरूद्धचा सामना जिंकले तरी त्यांचे 4 गुण होतील. युएसएने पाकिस्तान आणि कॅनडाला मात देत 4 गुणांची कमाई केली होती. आता त्यांना सामना रदद् झाल्याचा एक गुण मिळाला आहे. त्यामुळे ते 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावरून सुपर 8 साठी पात्र ठरले आहेत.