यजमान भारतीय संघातील महिला खेळाडूंनी गाजवला पहिला दिवस

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
निखत झरीनचा शानदार विजय
निखत झरीनचा शानदार विजय

 

नवी दिल्ली : यजमान भारतीय संघातील महिला खेळाडूंनी जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. स्टार खेळाडू निखत झरीन हिच्यासह साक्षी चौधरी, नूपुर शिओरॅन व प्रीती या तीनही खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत पुढच्या फेरीत पाऊल टाकले.

तेलंगणाच्या २६ वर्षीय निखत हिने ५० किलो वजनी गटात अझरबैझानच्या अनाखानीम इसमायीलोवा हिच्यावर सहज विजय मिळवला. निखतच्या झंझावातासमोर प्रतिस्पर्धी खेळाडूचा निभाव लागला नाही. अखेर रेफ्रींकडून ही लढत थांबवण्याचा (रेफ्री स्टॉप कॉन्टेस्ट) निर्णय घेण्यात आला. आता पुढील फेरीत निखतसमोर अव्वल मानांकित अल्जेरियाच्या रॉमायसा बौआलम हिचे आव्हान असणार आहे.

भारतीय खेळाडूंची प्रभावी कामगिरी निखतच्या विजयानंतरही कायम राहिली. साक्षीने ५२ किलो वजनी गटात कोलंबियाच्या मारिया मार्टीनेझ हिला पराभूत केले. नूपुर शिओरॅन हिने ८१ पेक्षा जास्त किलो वजनी गटात गयानाच्या ॲबियोला जॅकमनवर विजय साकारला. प्रीतीने ५४ किलो वजनी गटात हंगेरीच्या हैना लकोटार हिला नमवले. ही लढतही रेफ्रींकडून थांबवण्याचा निर्णय घेतला.

जागतिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली. फ्रान्सची खेळाडू लखदिरी वासिला हिने ५० किलो वजनी गटात २०१८ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती चीनच्या चँग युवान हिच्यावर ५-२ असा विजय संपादन करीत दमदार विजयाला गवसणी घातली.

जास्मिन, शशी, श्रुती आज लढणार
भारताच्या तीन खेळाडू बॉक्सिंगच्या रिंगणात उतरणार आहेत. जास्मिन लॅम्बोरिया ६० किलो वजनी गटात, शशी चोप्रा ६३ किलो वजनी गटात आणि श्रुती यादव ७० किलो वजनी गटात विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतील. रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी फ्रान्सची खेळाडू इस्तेल मोसेली हिचाही पहिला सामना उद्या असणार आहे. याशिवाय एलिफ गुनेरी, ओह ईऑन जी., एलेसिया मेसियानो, लिना वँग या दिग्गज खेळाडूचाही शुक्रवारी पहिला सामना असणार आहे.