आशियाई कुस्ती स्पर्धेत महिलांची विशेष कामगिरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 14 d ago
अंशू मलिक, सोनम मलिक आणि सरिता मोर सर्वोत्तम
अंशू मलिक, सोनम मलिक आणि सरिता मोर सर्वोत्तम

 

नवी दिल्ली : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी अंशू मलिक (५७ किलो वजनी गट), याच स्पर्धेत ब्रॉंझ पदक जिंकणारी सरिता मोर (५९ किलो वजनी गट) आणि ऑलिंपिकपटू सोनम मलिक (६२ किलो वजनी गट) यांनी आपापल्या वजनी गटातून सर्वोत्तम कामगिरी करत आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये स्थान मिळवले आहे. 

त्यांनी नवी दिल्लीमध्ये सध्या सुरु असणाऱ्या महिलांच्या पात्रता स्पर्धेमध्ये आपापल्या वजनी गटात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या तिन्ही महिला कुस्ती खेळाडूंनी जानेवारी महिन्यात भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात नवी दिल्लीमधील जंतर मंतर येथे आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी आंदोलनाचे कारण सांगून दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतला नव्हता. मात्र त्याचा या तीन खेळाडूंच्या कामगिरीवर काहीच परिणाम झाला नसून, त्यांनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली आहे. अंशूला पात्रता मिळवण्यासाठी जास्त कष्ट घ्यायची गरज नाही पडली , कारण ती लढत असलेल्या ५७ किलो वजनी गटात अंशूला कोणी प्रतिस्पर्धीच नव्हती . सरिताने सहभागी झालेल्या तिन्ही लढतींमध्ये विजय साकारला. तर सोनमने तांत्रिक गुणाने तिच्या तिन्ही लढतीत विजय संपादन केला . तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये दोन वेळा ब्रॉंझ पदक जिंकणारी विनेश फोगट आणि ऑलिंपिकमध्ये तिसरा क्रमांक मिळवणारी साक्षी मलिक यांनी मात्र या पात्रता स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही.

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेल्या महिला खेळाडू आणि त्यांचे वजनी गट
 • नीलम (५० किलो)
 • अंतिम फंगल (५३ किलो)
 • सितो (५५ किलो)
 • अंशू मलिक (५७ किलो)
 • सरिता मोर (५९ किलो)
 • सोनम मलिक (६२ किलो)
 • मनिषा (६५ किलो)
 • निशा दहिया (६८ किलो)
 • रितिका (७२ किलो)
 • प्रिया मलिक (७६ किलो)