पाच वर्षांची चिमुकली गाते 15 भाषांतली गाणी

Story by  छाया काविरे | Published by  Chhaya Kavire • 9 Months ago
रायमा शेख
रायमा शेख

 

तिचे वय आहे अवघे पाच वर्षे. या वयात मुले आपली मातृभाषाही नीट बोलू शकत नाहीत. मात्र, तिने मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, गुजराती, कोंकणी, भोजपुरी, इंग्लिश, इंडोनेशियन, तमिळ, मल्याळम, राजस्थानी अशा १५ भाषांमध्ये लता मंगेशकरांची गाणी गायली आहेत; किंबहुना गात आहे. नेमकी ही चिमुकली आहे तरी कोण? जाणून घेऊ या नाशिकची बालगायिका रायमा शेख ऊर्फ पिहू हिच्याविषयी...

- छाया काविरे 

 

'आपल्या गोड आवाजात अस्खलितपणे गाणारी भारतातली सर्वात लहान बालगायिका' हा विक्रम रायमा शेख हिच्या नावावर 'चिल्ड्रेन बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर, तिच्या या विलक्षण क्षमतेची दखल सुप्रसिद्ध 'इंडिया बुक रेकॉर्ड'नेसुद्धा घेतली आहे. आई वृषाली आणि वडील रज्जाक यांच्या प्रोत्साहनामुळे रायमाची ही गानकला बहरत गेली. रायमा पन्नासहून अधिक गाणी कुठेही न अडखळता अस्खलितपणे गाते. स्वतः गायिका असलेली तिची आई वृषाली तिची मार्गदर्शक आहे.

 

'जिंदगी प्यार का गीत है...', 'ये समा, समा है ये प्यार का...' (हिंदी), 'विठ्ठल तो आला आला...' (मराठी), 'माजे राणी माजे मोगा...' (कोंकणी), 'बेकस पे करम कीजिये... (उर्दू), 'श्रीरामचंद्र कृपालु भज...' (संस्कृत), 'वैष्णव जन तो तेणे कहिये जो...' (गुजराती), 'ए चंदामामा...', 'आरे आव पारे आव...' (भोजपुरी), 'यू नीडेड मी...' (इंग्लिश), 'दी तेपी पान्ताय...' (इंडोनेशियन), 'आरारो आरारो नीवेरो नन्वेरो...' (तमिळ), 'कदली कन्कदली चेंकदली...' (मल्याळम), 'थाने काई काई बोल सुणावा म्हारा सांवरा गिरधारी...' (राजस्थानी), अशी लतादीदींनी - अर्थात लता मंगेशकरांनी - अजरामर केलेली गाणी रायमा अत्यंत आत्मविश्वासाने व ताला-सुरात गाते.

 

विशेष म्हणजे, रायमाच्या आई वृषाली यांच्या नावावरही गाण्या विषयीचे विविध विक्रम आहेत. त्याही 'रेकॉर्डधारक' आहेत. 'जगातील पहिली अंध रेडिओ अँकर' म्हणून त्यांची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'सह 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स', 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, 'ॲसेट बुक ऑफ रेकॉर्ड्स' अशा विविध 'रेकॉर्ड बुक्स'मध्ये झालेली आहे. रायमाचे वडील रज्जाक यांची 'मिरॅकल ॲड एजन्सी' या नावाची इलेक्ट्रॉनिक (Audio & Audio-visual) जाहिरात-कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते रेडिओसाठी आणि टीव्हीसाठी जाहिराती तयार करतात व प्रसारित करतात. या शिवाय ते लघुचित्रपट व चित्रफितीही तयार करतात. 

 

रायमाला गाण्याची मनापासून आवड आहे आणि त्यातही लता मंगेशकर यांची बहुतांश गाणी ती गाते. आईप्रमाणेच तीही लतादीदींची मोठी चाहती आहे. ती निव्वळ पाठांतर करून गाते असे नव्हे तर, त्या गाण्याचा आत्मा आपल्या गाण्याच्या शैलीतून, देहबोलीतून रसिकांपुढे मांडण्याचा तिचा पूर्ण प्रयत्न असतो. त्यामुळे संबंधित भाषेचा गंधही नसलेल्या श्रोत्यालासुद्धा ते गीत बऱ्याच अंशी समजू लागते. अर्थात्, ती प्रत्येक भाषेतील गीत हे मातृभाषेतीलच गीत गात असल्याच्या सहजतेने व त्याच भाषेच्या उच्चारशैलीत (टोन) गाते. तिच्या या तोंडपाठ असलेल्या गाण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 'विविध भाषिक गायिका' होण्याच्या रायमाच्या या प्रक्रियेत वृषाली यांचा मोठा हातभार आहे. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणेच आपल्या मुलीचे गुण, ती पाळण्यात असतानाच, हेरून त्यांना पैलू पाडण्याचे कठीण कार्य वृषाली यांनी पार पाडले आहे.

 

रायमाचे आई-वडील म्हणतात : “रायमाने एक अत्यंत चांगली व्यक्ती व्हावे. जीवनाचा भरपूर आनंद लुटावा. इतरांना प्रेरणा मिळेल असे जीवन जगावे. तसेच, परमेश्वराने दिलेल्या देणगीचा उपयोग करून तिने एक उत्कृष्ट गायिका व्हावे.”

 

रायमा आणि आई वृषाली दोघीही आता पुढचा टप्पा गाठायच्या तयारीला लागल्या आहेत. रायमा 'रवींद्रनाथ विद्यालया'त सीनिअर केजीत शिकत असून अभ्यासातही तिला खूप गती आहे. अशा चिमुकल्या रायमाच्या आवाजाला आणि कौशल्याला 'आवाज मराठी'चा सलाम!

 

रायमाला मिळालेले पुरस्कार व तिच्या नावावरचे विक्रम :

  • 'पंधरा भाषांमध्ये गाणारी जगातली सर्वात लहान (पाचवर्षीय) गायिका,' म्हणून २०२२ मध्ये 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद.
  • 'चिल्ड्रेन बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद.       
  • आमदार सीमा हिरे यांच्यातर्फे गायक व संगीतकार शंकर महादेवन, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते २५ डिसेंबर २०२२ रोजी 'खानदेशरत्न' हा मानाचा पुरस्कार.   
  • 'रवींद्रनाथ टागोर शिक्षण संस्थे'तर्फे सन्मानचिन्ह, तसेच अनेक ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमांमध्ये गौरव.
  • 'नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन'तर्फे (NDOA) सन्मानचिन्ह देऊन गौरव. 

 

वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच रायमाने  गायला सुरुवात केली. अनेक कार्यक्रमांमध्ये सुरेल गायन करून ती रसिकांची मने जिंकत असते. रायमा सोशल मीडियावरही अत्यंत प्रसिद्ध असून, तिने गायिलेल्या गाण्यांची झलक 'न्यू मिरॅकल प्राॅडक्शन' या चॅनेलच्या  यूट्यूब लिंकवर पाहायला मिळेल.

 

रायमाला अभ्यासाबरोबरच अभिनयाचीही आवड असल्याने तिने शॉर्ट फिल्म्समध्येही अभिनय केला आहे. तिने अभिनय केलेल्या शॉर्टफिल्म्स पुढीलप्रमाणे :

  1. मैया मुझे माखन दो ना 
  2. मला तूच पाहिजे 
  3. दर्शन दे रे 
  4. करो ना लव