निजामी संपत्तीचे गूढ राहणार कायम

Story by  test | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
नवाब मिर बरकत अली खान वालाशहाँ मुकर्रम जहाँ बहादूर
नवाब मिर बरकत अली खान वालाशहाँ मुकर्रम जहाँ बहादूर

 

देशातील सर्वांत श्रीमंत संस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादचा शेवटचा निजाम काळाच्या पडद्याआड गेला. पण त्याचबरोबर अनेक प्रश्नही काळाच्या उदरात दफन झाले. त्याचे जीवन, संपत्ती याबाबतचे गूढ कायम राहील. श्रीमंत संस्थानचा वारसा सांगणारा या शेवटच्या वंशाने निजामी राजवटीचे तेजोवलय हरपताना पाहिले. नवाब मिर बरकत अली खान वालाशहाँ मुकर्रम जहाँ बहादूर हे हैदराबाद संस्थानचे आठवे निजाम होते.
 
मागील  शनिवारी त्यांचे तुर्कीएमध्ये निधन झाले होते. हैदराबाद संस्थानचे सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी १९५४ मध्ये मुकर्रम जहाँ यांना वारसदार म्हणून जाहीर केले होते. तेव्हापासून ते हैदराबादचे आठवे आणि शेवटचे निजाम बनले. ‘दि लास्ट निजाम: दि राईज अँड फॉल ऑफ इंडियाज ग्रेटेस्ट प्रिन्स्ली स्टेट’ या पुस्तकाचे लेखक जॉन झुब्राजस्की म्हणाले की, ‘‘ या मुस्लिम शासकाबाबत मी अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कथा ऐकत आलो आहे. ज्यांच्याकडे हिरे किलोने, मोती एकराने आणि सोन्याच्या विटा टनांनी मोजल्या जात होत्या पण वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र ते फार कंजुष होते. अगदी कपड्याच्या इस्रीसाठीच्या पैशाची देखील ते बचत करत असत.’’
 
आईही राजकन्या
मुकर्रम जहाँ यांचा जन्म १९३३ मध्ये फ्रान्समध्ये झाला होता. त्याची आई दुर्रू शेवार ही तुर्कस्तानचे शेवटचे (आटोमन साम्राज्य) सुलतान अब्दुल मेजिद- द्वितीय यांची राजकन्या होती. मुकर्रम जहाँ यांना १९७१ च्या अखेरपर्यंत हैदराबादचे राजपुत्र संबोधले जात असे. त्यानंतर मात्र सरकारनेच ही पदवी त्यांच्याकडून हिरावून घेतली, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार आणि हैदराबादी संस्कृती आणि वारशाचे अभ्यासक मीर अय्यूब अली खाँ यांनी दिली.
 
तुर्कस्तानात अनुभवला एकांत
मुकर्रम जहाँ पुढे ऑस्ट्रेलियाला गेले. तिथेही ते राजपुत्र म्हणूनच वावरले. पुढे त्यांचे वास्तव्य तुर्कस्तानात होते. ऑस्ट्रेलियामध्ये मुकर्रम जहाँ यांची वेगळीच जीवनशैली होती. हत्तीवर बसणारी ही स्वारी तेथील वाळवंटात बुलडोझर चालवायला शिकली. तुर्कस्तानात मात्र ते कमालीच्या एकांतात जगले. तुर्कस्तानमध्ये ते केवळ दोन सुटकेस घेऊन आले होते, असे झुबरेझस्की यांनी सांगितले.
 
वैवाहिक आयुष्य, पॅलेसची जबाबदारी
पत्रकार अय्यूब अली खान म्हणाले की, हैदराबादला मुकर्रम जहाँ यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. कारण त्यांना त्यांच्या आजोबाकडून मोठी संपत्ती मिळाली होती पण प्रत्यक्षात तसे काहीच होऊ शकले नाही. मुकर्रम यांनी १९५९ मध्ये तुर्कस्तानच्या राजकन्या इसरा यांच्यासोबत विवाह केला होता. पुढे दोघांनी घटस्फोट देखील घेतला. वीस वर्षांनंतर मुकर्रम यांनीच इसरा यांना हैदराबादेत बोलाविले होते पण तेव्हा मात्र त्यांच्याकडे काहीच शिल्लक नव्हते. चौमहाल पॅलेस आणि फलकनुमा पॅलेस या वास्तूंच्या डागडुजीची जबाबदारी माझ्यावर आल्याचे इसरा यांनी सांगितले. मुकर्रम जहाँ यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान येथील खिलावत पॅलेसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. असफ जाही कुटुंबीयांच्या कबरीच्या शेजारीच त्यांचे दफन करण्यात येईल. भारतातच आपले दफन केले जावे, अशी मुकर्रम यांची इच्छा होती. उद्या शासकीय इतमामामध्ये मुकर्रम जहाँ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.