धाराशिव जिल्ह्यातील अणदूर हे छोटेसे गाव. या गावातील जवाहर विद्यालयात शिकलेल्या हिना शेख. सर्वसामान्य मुस्लीम आणि शेतकरी कुटुंबातील ही मुलगी आज साहित्याच्या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. हिना रुबाब शेख यांचा हा प्रवास अतिशय खडतर आणि तितकाच प्रेरणादायी आहे. वडील शेतकरी आणि आई केवळ सातवी शिकलेली. पण आईला शिक्षणाची प्रचंड ओढ होती. त्यामुळेच हिना यांनी शिक्षणाची कास धरली.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून २०१६ मध्ये एम.ए. आणि त्यानंतर पुणे विद्यापीठातून बी.एड. पूर्ण केले. सध्या त्या मुंबई विद्यापीठातून मराठी विषयात पीएच.डी. करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे लग्न विसाव्या वर्षीच झाले. त्यांना दोन मुली देखील आहेत. तरीही संसाराचा गाडा सांभाळत त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही.
घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्च करणे वडिलांना शक्य नव्हते. त्यामुळे हिना आणि त्यांच्या दोन भावांनी नोकरी करून स्वतःचा खर्च भागवला. पुण्यात शिकताना दिवसा कॉलेज आणि संध्याकाळी प्रुफ रिडींगचे काम करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. प्रसंगी मेसचे जेवण कमी करून पैशांची बचत केली. त्यांचे दोन्ही भाऊ उच्चशिक्षित असून एक एम. फार्मसी, तर दुसरा सर्जन डॉक्टर आहे.
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप आणि साहित्यातील वाटचाल
या संघर्षाचीच पावती म्हणून हिना यांना २०२५-२६ ची प्रतिष्ठेची 'शरद पवार इंस्पायर फेलोशिप' मिळाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून कृषी, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील गुणवंतांना ही फेलोशिप दिली जाते. साहित्यातील कथा, कादंबरी, ललितलेखन, विज्ञान साहित्य अशा प्रकारांतून हिना यांची 'चरित्र' या ललितलेखन विभागासाठी निवड झाली आहे. राज्यभरातून आलेल्या अर्जांची छाननी आणि मुलाखतींच्या कडक प्रक्रियेनंतर केवळ १० ते १२ जणांची अंतिम निवड करण्यात आली.
येत्या १४ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ही फेलोशिप त्यांना प्रदान केली जाणार आहे. ही फेलोशिप नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाते. यासाठी एका वर्षाचे मानधन आणि मार्गदर्शक लाभणार आहेत. या काळात हिना यांना संशोधन आणि लेखन पूर्ण करायचे आहे. त्यानंतर त्यांच्या संशोधनावर आधारित पुस्तक प्रकाशित केले जाईल.
मुस्लीम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या चरित्रलेखनासाठी मिळाली फेलोशिप
हिना यांनी फेलोशिपसाठी 'हमीद दलवाई यांचे संक्षिप्त चरित्र' हा विषय निवडला आहे. हा विषय निवडण्यामागचे कारण सांगताना हिना म्हणतात, "हमीद दलवाई हे एक क्रांतिकारी विचारवंत होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते की, जसा मुस्लिम समाजाला एक हमीद दलवाई मिळाला, तसाच हिंदू समाजालाही एका हमीदची गरज आहे. ४०-५० वर्षांपूर्वी दलवाईंनी तोंडी तलाक विरोधात लढा उभारला होता. त्यांनी समान नागरी कायद्याचा पुरस्कार केला. वक्फ बोर्डाचा निधी हा शिक्षण आणि आरोग्यासारख्या सामाजिक कार्यासाठी वापरावा, असे धाडसी विचार त्यांनी मांडले होते. आजच्या काळातही हे विचार तितकेच महत्त्वाचे आहेत."
त्या पुढे म्हणतात, "हमीद दलवाई यांच्यावर अनेक पुस्तके, कथासंग्रह आहेत. डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनीही त्यांच्यावर संशोधन केले आहे. मात्र दलवाईंचे एक समग्र चरित्र अद्याप आलेले नाही. त्यामुळेच मी हा विषय निवडला आहे. हमीद दलवाई कोण होते, त्यांचे विचार काय होते आणि त्यांचा वारसा पुढे कसा नेला पाहिजे हे नवीन पिढीला समजणे गरजेचे आहे. हाच या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे."
हिना शेख यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या यशाचा आलेख नाही, तर परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या प्रत्येक ग्रामीण मुलीसाठी आशेचा किरण आहे. 'चूल आणि मूल' या चौकटीत अडकलेल्या समाजाला त्यांनी आपल्या कृतीतून सणसणीत उत्तर दिले आहे. संसाराची जबाबदारी पेलतानाच, शिक्षणाची ज्योत मनात तेवत ठेवली तर काय साध्य होऊ शकते, याचे त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत.
ज्या वयात अनेक मुलींची स्वप्ने कौटुंबिक जबाबदाऱ्यांखाली दबून जातात, त्या वयात हिना यांनी पीएच.डी. आणि राज्यस्तरीय फेलोशिपपर्यंतचा पल्ला गाठला आहे. त्यांच्या लेखणीतून हमीद दलवाईंचे चरित्र उलगडणार आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांचा स्वतःचा जीवनप्रवास भावी पिढीतील असंख्य मुलींना 'लिहितं' आणि 'लढतं' राहण्याची प्रेरणा देत राहील.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -