पाळी आणि मी : एका मुस्लीम तरुणीचे मनोगत

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 4 Months ago
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

 

पाळीच्या रक्तस्रावाला शारीरिक संबंधांची खूण समजत संशय घेऊन १२ वर्षांच्या बहिणीची सख्ख्या भावाने हत्या केली. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील उल्हासनगर येथे गेल्या आठवड्यात घडली. मुलीची पहिलीच पाळी असल्याने, हे रक्त कशाचे आहे, हे तिलाही माहीत नव्हते. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हृदयद्रावक घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘आवाज मराठी’वर मासिक पाळीविषयी प्रबोधन करणारे लेख प्रसिद्ध होत आहेत. त्यापैकीच हा एक लेख 
 
माझं नाव अफरोज. मी पुण्यात नोकरी करते. मी एका विभक्त मुस्लिम कुटुंबात वाढले. माझे आई-वडील दोघेही नोकरी करत. माझी पाळी आली तेव्हा मी साडेनऊ वर्षांची होते. माझ्याबरोबर माझ्या आई वडिलांसाठी सुद्धा तो एक धक्का होता. मी त्यावेळी इतकी लहान होते की त्यावेळी कपडे धुण्याचे ट्रेनिंग झालं नव्हतं आणि त्यात आई माझ्या प्रश्नांनी भंडावून गेली होती. मी इतकी रडत होते की माझी पोटदुखी विसरून गेले.
 
हे मलाच का झाले, रक्त येते तर बँडेज का नाही बांधत, आपला तो ऑपरेशन होईल, आपण सायकल जास्त खेळलो म्हणून जांघेतील जागा फाटली काय, आणि आई-वडील का निवांत आहेत, मी अशी का दिसते, मी नको तिथे का वाढले, आता मुलं माझ्याकडे पाहत असतील का, हे मलाच का झाले हे मैत्रिणींना का नाही झालं, आई याबद्दल बोलायला नको का म्हणते, मी याबद्दल मैत्रिणींशी बोलू का शकत नाही, आई जबरदस्ती आता इथून पुढे मुलांची बोलू नको असे का म्हणताय, अशा अनेक प्रश्नांचे मनात काहूर माजले होते.

माझ्या काही लहान बहिणी आणि भावांनी अभ्यासात गती घेतली. शेंडेफळ बहिण इंजिनिअरिंग मध्ये यश मिळवू लागली. शिक्षित झाली. तिने घर स्वच्छ ठेवायला सुरुवात केली. मैत्रिणींनी सांगितल्याप्रमाणे सॅनिटरी पॅड वापरायला सुरुवात केली, घरात शौचालय बांधून घेतले. मीच त्यांना पॅड द्यायचे, कसे वापरायचे ते सांगायचे.  मला हे माहीत होतं असे सांगू लागले. मग माझा आत्मविश्वास परत आला.

माझे आई वडील, आजी स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षिका होती. तत्कालीन महिला पंतप्रधान इंदिरा गांधींचा तिच्यावर फार प्रभाव होता. तिच्यात महिला शशक्तीकरणाची बीज रोवली होती. माझ्या आई आणि मावशी पॅड वापरत असत. माझी आजी पाळी म्हणत असे, आई एमसी आणि आम्ही पीरियड्स म्हणतो.

पिरियड्स असताना नमाज कुराण आणि रोजा वर्ज्य असतो. भारतात देवाचे नाव घेणेदेखील वर्ज्य आहे. जसे पायी वारी करताना पाळी आली तर वेगळे बसवतात तसेच हजमध्ये पाळी आली तर हॉटेलमध्ये चार-पाच दिवस राहून नंतर उरलेला हज पूर्ण करता येतो. मला पहिले पीरियड्स आले तेव्हा मी कुराण वाचलं होतं, तेव्हा आई अतिशय घाबरली होती. आमचे मौलाना म्हणाले चुकून झाले तर हे क्षम्य आहे. 

आमच्या गावी चुलत चुलत काकांचे राहते घर होते. ते घर अगदी लहान होते. दोन्ही काकांना चार चार मिळून आठ मुलं होते. अंधाऱ्या खोलीत काक्या त्या चुलीवर स्वयंपाक करत. घराला खिडक्या असल्या तरी त्या बंद होत्या. त्याला पडदे होते. दाराला पडदा होता. बाथरूम  कायम अंधारलेला होता. लहान असताना आम्ही तिकडे जातच नसू. आम्ही सरळ सांगू की मला तिथे भीती वाटते म्हणून आम्ही राहणार नाही. सगळी भावंडे आमच्यापेक्षा लहान होती. कित्येक जण शाळेत जात नसत.  एकदा पर्याय नसताना मला बाथरूम मध्ये जावे लागले. त्यावेळी मी काळे झालेले कपडे अंधुक पाहिले. मी काकीला विचारले, की कपडे बाहेर का टाकत नाही? त्यावर काकी म्हणाली आम्हाला तुझ्या घरासारखी गच्ची नाही. मला आता विचार करून सुन्न वाटतं की काक्या त्या घरात कशा राहत होत्या? सतत अस्वच्छ असे लहान मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना थोडी सुद्धा उसंत नसे. त्या स्वतःकडे काय लक्ष देणार?

ते काय करत असतील त्याची कल्पना नाही. एकदा मॉर्निंग पिटी  असताना शाळेत तर मी धावताना माझी बॅड खाली पडले तर सगळ्या शिक्षकांमध्ये मी चर्चेचा विषय झाले. सगळ्या माझ्यावर हसत असत. आता मी हसते. आता नोकरीच्या ठिकाणी 'माझ्या पिरियड्स आहेत'असे सांगायला लाज वाटत नाही. लोकांनाच लाज वाटते. विशेषतः पुरुषांना. पीरियड्स हा विषय आहे, पण त्याबद्दल उघडपणे बोललं की त्या भेवती असलेला taboo, संकोच निघून जातो. मोकळेपणा येतो. एकमेकांबद्दल आदर वाढतो आणि स्त्री पुरुष समानतेची  बीजे रोवली जातात असे मला वाटते

- अफरोज इनामदार