अफगाणी मुली सहावीनंतर शिक्षणापासून वंचित!

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 3 Months ago
मुस्लीम मुली
मुस्लीम मुली

 

अफगाणिस्तानातील काबूलमधील बहारा रुस्तुम हिने नुकतेच सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र याबद्दल आनंद होण्याऐवजी तिला याचे दुःख होत आहे. बहाराप्रमाणेच सहावी उत्तीर्ण झालेल्या अफगाणिस्तानातील अनेक विद्यार्थिनींना आनंदाऐवजी दुःखच होत आहे. याचे कारण म्हणजे सध्या अफगाणिस्तानात सत्तेवर असणाऱ्या तालिबानने येथील मुलींना इयत्ता सहावीनंतर शिक्षण घेण्यावर बंदी घातली आहे.

अमेरिका आणि नाटो सैन्याने २०२१मध्ये अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबानने येथील सत्ता ताब्यात घेतली. यानंतर तालिबानने येथील मुलींना इयत्ता सहावीनंतर शिक्षण घेण्यास मनाई केली. तालिबानने विद्यार्थिनींच्या शिक्षणावर बंदी घालण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा जगभरातील देशांनी निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र तरीही तालिबानने मुलींच्या शिक्षणावर बंदी कायम ठेवली आहे.

मागील आठवड्यातच संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत रोजा ओटुनबायेवा यांनी तालिबानच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली. ‘‘अफगाणिस्तानातील सत्ताधाऱ्यांच्या निर्णयामुळे येथील मुलींची पिढी दिवसेंदिवस मागे पडत आहे,’’ अशी खंत त्यांना या वेळी व्यक्त केली. दरम्यान, अफगाणिस्तानात सर्व वयोगटातील मुलींना मदरशांमध्ये शिक्षण घेता येणार असल्याचे अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. मात्र येथे त्या मुलींना आधुनिक शिक्षण देण्यात येईल की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने, ही घोषणा समाधानकारक नसल्याचे ओटुनबायेवा म्हणाल्या.

सहावी उत्तीर्ण झालेली अफगाणिस्तानातील सेतायेश साहिबजादा हि विद्यार्थिनी म्हणते,  "मला यापुढे शिक्षण घेता येणार नाही, याचे मला दुःख होत आहे. मला शिक्षिका व्हायचे होते. माझे स्वप्न आता अपुरेच राहणार आहे. मी माझ्या पायावर कधीच स्वतंत्रपणे उभी राहू शकणार नाही." 
 
अफगाणिस्तानचे शिक्षणतज्ज्ञ महंमद सलीम म्हणतात, "महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे अफगाणिस्तानसाठी नुकसानकारक ठरणार आहे. ज्या देशात अशिक्षित नागरिकांची संख्या अधिक असते, तो देश कधीच समृद्ध होऊ शकत नाही आणि तेथील जनतासुद्धा मुक्तपणे जगू शकत नाही."