भारतीय विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. बुशरा अतिक

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 5 Months ago
डॉ. बुशरा अतीक
डॉ. बुशरा अतीक

 

देशासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये एका मुस्लिम महिलेचे नाव आदराने घेतले जाते. विज्ञानक्षेत्रातील आपल्या कामासाठी त्या महिलेला भारत सरकारने विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’, ‘सन फार्मा सायन्स फाउंडेशन’तर्फे दिला जाणारा ‘संशोधन पुरस्कार’ अशा नामांकित पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्या सध्या कानपूर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये (IIT-आयआयटी) ‘कर्करोग जीवशास्त्र आणि आण्विक ऑन्कॉलॉजी’ या विभागात संशोधक आणि सहयोगी प्राध्यापिका आहेत. जाणून घेऊया उत्तर प्रदेशातील ४७ वर्षीय संशोधक डॉ. बुशरा अतीक यांच्याविषयी... 

आनुवांशिक आणि एपिजेनेटिक बदलांचा शोध घेणे हे डॉ. बुशरा यांच्या संशोधनाचे प्रमुख क्षेत्र आहे. (एपिजेनेटिक बदल म्हणजे जीन्स-अभिव्यक्तीच्या बदलामुळे जीवांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास). वैद्यकीय क्षेत्रातील नवीन धोरणांचा, दृष्टिकोनांचा वापर करून कर्करोगविषयक संशोधन करणे, तसेच आनुवांशिक व एपिजेनेटिक बदलांचा शोध घेणे हा त्यांच्या स्वारस्याचा विषय आहे. याशिवाय, कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या आण्विक घटनांचा शोध घेणे आणि केमोथेरप्युटिक औषधांचा प्रतिकार करण्याची प्रक्रिया सुलभ करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या शोधांमुळे अधिक प्रभावी उपचार विकसित होऊ शकतात असे त्यांना वाटते.
 
कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल डॉ. बुशरा सांगतात, "मी खूप उदारमतवादी आणि उत्साहवर्धक वातावरणात वाढले. माझ्या आई-वडिलांनी आमच्यांत - बहिणी आणि भावांमध्ये - कधीही भेदभाव केला नाही. आमच्या घरातील कामेही लिंगनिरपेक्ष नव्हती. अशा प्रकारच्या संगोपनामुळे माझ्यात अधिक आत्मसन्मान आणि धैर्य निर्माण झाले असे मला वाटते. आव्हानांवर किंवा अडथळ्यांवर मात करण्यास, तसेच इतरांच्या पूर्वग्रहांमुळे आपल्याला निराशा येऊ नये यासाठी माझ्या कुटुंबीयांनी मला मदत केली. माझ्यामध्ये योग्य दृष्टिकोन आणि स्वाभिमान निर्माण केल्याबद्दल मी माझ्या आईची नेहमीच ऋणी आहे.”

आपल्या आईबद्दल अधिक बोलताना त्या सांगतात, “ती माझ्यासाठी एक शक्तिशाली आदर्श आहे. माझ्या मार्गात कितीही अडथळे आले तरी माझ्या स्वप्नांचे अनुसरण करण्यासाठी तिच्या दृढनिश्चयाने आणि दृढविश्वासानेच मला प्रोत्साहित केले.” 

संशोधक म्हणून आपले विचार मांडताना बुशरा म्हणतात, “मला माझी वाट निवडताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. अशा आव्हानांचा सामना संशोधनाची स्वतंत्र कारकीर्द सुरू करणार्‍या प्रत्येकालाच करावा लागतो. प्राध्यापकपदाच्या नोकरीसाठी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीदरम्यान एका नामांकित संस्थेने, ‘तुमच्याकडे ‘शैक्षणिक वंशावळ’ नाही’ हे कारण देऊन मला नोकरी नाकारली. दुसर्‍या एका संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापकाने मला, ‘अलीगढ मुस्लिम विद्यापीठा’त किंवा ‘जामिया मिलिया इस्लामिया’ येथून विद्याशाखा पद घेण्याचा सल्ला दिला. त्या वेळी अशा प्रकारच्या टिपण्णींनी मला खूप अस्वस्थता येई. मात्र, मला हे करायचेच आहे यावर मी ठाम होते. त्यामुळे, माझ्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आणखी जोमाने काम करण्याचीच प्रेरणा मला या सगळ्या प्रकारांमुळे मिळत गेली."

सामोऱ्या गेलेल्या आव्हानांबद्दल त्या सांगतात, "मी एक चिरंतन आशावादी व्यक्ती आहे आणि कामाच्या ठिकाणच्या किंवा वैयक्तिक आघाडीवरच्या आव्हानांचा एक ‘निरोगी डोस’ आपल्या सर्वांगीण वाढीस मदत करतो, असा मला विश्वास आहे!" 

"सहानुभूती असणे हा एक अतिशय महत्त्वाचा गुण आहे; विशेषत: जेव्हा तुम्ही तरुण संशोधकांच्या/विद्यार्थ्यांच्या गटाचे नेतृत्व करत असता तेव्हा त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी हा गुण अतिशय पूरक ठरतो. त्यांच्या भावनांबद्दल आणि विचारप्रक्रियांबद्दल आपणही सजग असायला हवे हे या गुणामुळे जाणवते आणि तसे वागणे शक्य होते. कारण, पीएच.डीच्या विद्यार्थ्यांचा प्रवास हा अनेकदा अनिश्चिततेने भरलेला असतो," डॉ. बुशरा सांगतात.

आपल्या लेखी यशाचा अर्थ काय आहे, याविषयी त्या म्हणतात, "माझ्या आवडीचे काम करण्याचे स्वातंत्र्य मला आहे आणि असे स्वातंत्र असणे हेच माझ्या लेखी माझे यश आहे! माझ्या आजूबाजूच्या लोकांवर याचा सकारात्मक प्रभाव पडतो. नवा दिवस नव्याने सुरू करण्यासाठी ही प्रेरणा पुरेशी असते. माझे कार्य समाजाच्या भल्यासाठी हातभार लावू शकते हे जाणून मला खरोखर समाधान वाटते. आणखी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मला यातून मिळते."

Bushra Ateeq
 
तरुणाईला प्रेरणा देताना त्या काव्यात्म भाषेत ही प्रेरणा देतात. त्या म्हणतात, "तुझ्या आत्म्यात एक जीवनशक्ती वसत आहे, त्या जीवनशक्तीचा शोध घे. तुझ्या शरीराच्या (व्यक्तित्वाच्या) पर्वतात रत्ने दडलेली आहेत, ती खाण शोध! हे प्रवासी, जर तू अशा रत्नांच्या शोधात असशील तर त्या रत्नांचा शोध तू बाहेर घेऊ नकोस. स्वतःच्या आतच डोकाव आणि तिथेच त्यांचा शोध घे!"

वैद्यकीय संशोधनाच्या किंवा डॉ. बुशरा निवडलेल्या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या महिलांना त्या सल्ला देतात, "सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल व तुमचे मूल्य आणि क्षमता यांची जाणीव ठेवावी लागेल. असे केल्यास तुम्हाला हवे ते सर्व काही तुम्ही मिळवू शकाल. तुम्हाला समाधान आणि आनंद मिळेल असेच करिअर निवडा. आणि, जोखीम घेण्यास अजिबात कचरू नका!"

कौन हैं IIT कानपुर की डॉ. बुशरा अतीक, जिन्हें मिलेगा सन फार्मा साइंस  फाउंडेशन रिसर्च अवार्ड | who is IIT Kanpur Associate Professor Dr. Bushra  Ateeq Awarded By Sun Pharma - Hindi ...
 
शैक्षणिक पार्श्वभूमी 
डॉ. बुशरा या अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. तेथील प्राणिशास्त्र विभागातून त्यांनी १९९४ मध्ये बीएस्सी (ऑनर्स), १९९७ मध्ये एमएस्सी आणि २००३ मध्ये पीएच.डी. पूर्ण केली आहे. बुशरा यांनी त्यांची कारकीर्द नवी दिल्ली येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) येथे ‘सहयोगी संशोधक’ म्हणून सुरू केली. त्यानंतर दिल्लीतच ‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे’तही (CSIR) त्यांनी ‘सहयोगी संशोधक’ म्हणून काम पाहिले. डॉ. बुशरा सध्या कानपूरच्या आयआयटीमध्ये जीवशास्त्र आणि जैवअभियांत्रिकी विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. बुशरा ह्या फेब्रुवारी २०१३ मध्ये कानपूरच्या आयआयटीत BSBE विभागात रुजू झाल्या. मिशिगन विद्यापीठाच्या ‘मिशिगन सेंटर फॉर ट्रान्स्लेशनल पॅथॉलॉजी’ येथे डॉ. अरुल चिन्नईयन यांच्या ग्रुपमध्ये ‘पोस्टडॉक्टरल फेलो’ म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आयआयटीमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी तेथे ‘संशोधन-अन्वेषक’ (ज्युनिअर फॅकल्टी) म्हणून काम केलेले होते. यापूर्वी, त्या कॅनडातील मॉन्ट्रियल येथील मॅकगिल  विद्यापीठात (McGill University) सन २००५ मध्ये डॉ. शफाअत रब्बानी यांच्यासमवेत ‘पोस्टडॉक्टरल’च्या प्रशिक्षणार्थी होत्या. त्यांनी नवी दिल्ली येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ व ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी’ येथे सहयोगी संशोधक म्हणून काम केले आहे.

Eminent scientist Dr Bushra Ateeq interacts with KU students - Greater  Kashmir
 
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्ट योगदान
डॉ. बुशरा यांना वैद्यकीय विज्ञानक्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी 'शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०२०' या भारतातील सर्वोच्च विज्ञानपुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो, ते दिवंगत डॉ. शांती स्वरूप भटनागर हे 'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे'चे (CSIR-सीएसआयआर) संस्थापक-संचालक होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ता. २६ सप्टेंबर २०२२ रोजी सीएसआयआरच्या स्थापनादिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सन २०१३ मध्ये कानपूरच्या आयआयटीमध्ये रुजू झालेल्या डॉ. बुशरा ह्या कर्करोगावर संशोधन करत आहेत. विज्ञानश्रेणीत त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
 

 

सन्मान आणि पुरस्कार 

• वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेद्वारे (CSIR-सीएसआयआर) वैद्यकीय विज्ञानातील विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार-२०२०.
• भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे ‘एस. रामचंद्रन-नॅशनल बायोसायन्स ॲवॉर्ड फॉर करिअर डेव्हलपमेंट-२०२१’.  
• ‘सन फार्मा सायन्स फाउंडेशन’तर्फे ‘संशोधन पुरस्कार-२०२१’
• लखनौच्या CSIR-केंद्रीय औषध संशोधन संस्थेतर्फे औषधसंशोधनातील उत्कृष्टतेसाठी CSIR-सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट अवॉर्ड (२०२०) .
• भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), भारत सरकारद्वारे बायोमेडिकल सायन्सेसमधील ‘बसंती देवी अमीरचंद पुरस्कार-२०१९’.
• कानपूरच्या आयआयटीतर्फे ‘सीएनआर राव फॅकल्टी ॲवॉर्ड फॉर एक्सलन्स इन रिसर्च-२०१९’ 
• संशोधनातील उत्कृष्टतेसाठी नवी दिल्ली येथील जामिया हमदर्दचा ‘सईदा बेगम महिला शास्त्रज्ञ पुरस्कार-२०१९’.
• कानपूरच्या आयआयटीतर्फे ‘उत्कृष्ट युवा प्राध्यापक पी. के. केळकर संशोधन पुरस्कार-२०१७’.
• २०१३ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची ‘रामानुजन फेलोशिप’.
• ‘विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळा’कडून २०१३ मध्ये  ‘फास्ट-ट्रॅक यंग सायंटिस्ट पुरस्कार’.
• ‘अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्च’च्या ऑरलॅंडो येथे झालेल्या वार्षिक बैठकीत ‘वुमन इन कॅन्सर रिसर्च स्कॉलर ॲवॉर्ड-२०११’
• ब्रेस्ट कॅन्सर रिसर्चसाठी ‘एक्सपीडिशन इन्स्पिरेशन फंड’कडून ‘यंग इन्व्हेस्टिगेटर ॲवॉर्ड-२००९’ 
• दक्षिण सॅनफ्रान्सिस्कोतील ‘जेनेन्टेक फाउंडेशन’तर्फे ‘जेनेन्टेक पोस्टडॉक्टरल पुरस्कार’.
• ‘स्केलेटल हेल्थ रिसर्च’मधील धोरणात्मक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ‘कॅनेडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्च’तर्फे ‘संशोधन पुरस्कार’

0X0X0

- छाया काविरे ([email protected]
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube