आसामच्या दुर्गम खेड्यातून इस्रोकडे गरुडझेप घेणाऱ्या वैज्ञानिक नाझनीन यास्मिन

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 8 Months ago
नाझनीन यास्मिन
नाझनीन यास्मिन

 

दौलत रहमान/ गुवाहाटी

जगावर कोविडचे संकट पसरले होते त्यावेळी नव्याने नियुक्त झालेला वैज्ञानिकांचा एक गट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये-इस्रोमध्ये- दाखल झाला. या वैज्ञानिकांमध्ये जुरिता या आसामच्या दुर्गम खेड्यातून आलेल्या नाझनीन यास्मिन यांचाही समावेश होता. इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याचे कळताच त्यांच्या नागाव या गावी जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण होते. 

 

आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रामध्ये नाझनीन यास्मिन वैज्ञानिक म्हणून कार्यरत होत्या. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणात आणि यशस्वी लँडिंगमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्या गर्भवती होत्या. आणि चांद्रयान-३ प्रक्षेपणाच्या सहा महिन्यांपूर्वी त्या बाळंतीण झाल्या. त्यामुळे संशोधकातून  सुट्टी घेऊन त्यांना सासरी म्हणजे आसामच्या बोंगाईगांव जिल्ह्यातील अभयपुरी या गावी यावे लागले. मात्र चांद्रयान-३ चे लॉन्चिंग जवळ आल्यामुळे त्यांनी आपली सुट्टी रद्द केली आणि कर्तव्यदक्ष  नाझनीन कामावर रुजू झाल्या. 

 

नागांव जिल्ह्यातील जुरिया येथील नूरुद्दीन फुरकानिया शाळेतून नाझनीन यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. २००७मध्ये कदमानी टाऊन हॉल विद्यालयातून त्या पहिल्या वर्गात दहावी पास झाल्या. त्यानंतर नागाव येथीलच अल्फाबिटा सायन्स जुनिअर कॉलेजमधून त्या प्रथम श्रेणीतून बारावी उत्तीर्ण झाल्या. 

 

२०१३मध्ये निट्ज़ मिर्जा कॉलेज, गुवाहाटी येथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंगमध्ये बी. टेक.ची पदवी प्राप्त केली. २०१६मध्ये तेजपूर विश्वविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक डिझाईन आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम श्रेणीत एम.टेक.मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.  

 

यानंतर नाझनीन यांनी विविध वैज्ञानिक संस्थांमध्ये कामाला सुरुवात केली. २०१८मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची (युजीसी) म्हणजे युजीसीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) त्या विशेष श्रेणीत (डिस्टिंक्शन)उत्तीर्ण झाल्या आणि भारत सरकारची जुनियर रिसर्च फेलोशिपही (JRF) मिळवली.  

 

याच दरम्यान इस्रोमध्ये वैज्ञानिक पदाची जाहिरात आली आणि नाजनीन यांनी या परीक्षेसाठी तयारी सुरु केली. इंटरनेट आणि वैज्ञानिक मित्र- मैत्रिणींच्या मार्गदर्शनाचा त्यांना मोठा उपयोग झाला. परीक्षेत त्यांना यश मिळाले. त्या ही परीक्षा त्यांनी विशेष श्रेणीसह उत्तीर्ण झाल्या. लेखी परीक्षेनंतर मौखिक परीक्षा आणि मुलाखत हे दोन टप्पे अजून शिल्लक होते. शिलॉंग येथील नोर्थ डिस्टन्स स्पेस एप्लीकेशन सेंटरमध्ये या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेतही त्यांनी डिस्टिंक्शन मिळवले.  

 

लहानपणापासून वैज्ञानिक बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि भारताचे मिसाइल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या नाझनीन यांची इस्रोमध्ये कनिष्ठ वैज्ञानिक म्हणून निवड करण्यात आली. इस्रोमध्ये नियुक्त होणाऱ्या उत्तर पूर्व भारतातील त्या एकमेव वैज्ञानिक आहेत. 

 

नाजनीन यांचे वडील अबुल कलाम आझाद आणि त्यांच्या मंजिला बेगम दोघेही पेशाने शिक्षक आहेत. मुलीच्या यशाचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. ‘आवाज’कडे भावना व्यक्त करताना ते म्हणतात,  ‘तुमच्याकडे धैर्य असेल, निष्ठा असेल तर कोणीही तुमच्या यशामध्ये अडथळा ठरू शकत नाही… आणि तुम्ही सर्वोच्चस्थानी पोहोचू शकता.’

 

नाझनीन यांनी मिळवलेले यश केवळ भारतभरातील महिलांसाठी, विशेषतः मुस्लिम महिलांसाठी प्रेरणादायक आहे. भविष्यात नाझनीन यांना इस्रोमध्ये मोठे योगदान द्यायचे आहे. भविष्यात नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ‘नासा’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्नही नाझनीन यांनी पाहिले आहे, आणि त्यादिशेने त्यांचा प्रवासही सुरु आहे. 

दौलत रहमान