महिलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा निर्धार

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
महिला-२० परिषद
महिला-२० परिषद

 

छत्रपती संभाजीनगर: महिलांच्या प्रगतीला अडथळा ठरणारी मानसिकता व वर्तनात बदल घडवून आणणे, तळागाळामधील महिला नेतृत्वासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करणे यासह अन्य विषयावर देश-विदेशांतील पाहुण्यांनी महिला-२० परिषदेत मंथन करण्यात आले. परिषदेत सहभागी देश-विदेशातील १५० महिलांनी सुमारे ७० सूचना या परिषदेत मांडल्या.

महिलांना जीवन जगता यावे, असे वातावरण निर्माण करणे, जिथे महिलांना त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्याही आयुष्यात बदल घडविता येतील, अशी समान संधी निर्माण करणे आणि महिला-प्रणीत विकास हा उद्देश असलेल्या महिला-२० परिषदेला सोमवारी हॉटेल रामामध्ये सुरवात झाली होती. संमेलनात सदस्य देश, अतिथी देश व विशेष निमंत्रित अशा १५० महिला मान्यवरांनी सहभाग नोंदविला.
 
 
दुसऱ्या दिवशी मंगळवारी परिषदेची सुरवात ‘अडथळे दूर करणे, महिलांच्या अपारंपरिक कथा’ या विषयांवरील विशेष सत्राने झाली. यात शाझिया खान, दिशा अमृत, तविशी सिंग आणि स्वाती भंडारी या भारतीय नौदलातील रणरागिणींचा सहभाग होता. या महिलांनी पितृसत्ताक विचारांना मोडून काढण्यासाठी सामाजिक रीतिरिवाजाविरोधात जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले. नेव्ही वेल्फेअर अँड वेलनेस असोसिएशनच्या प्रतिनिधी दीपा भट-नायर यांनी भारतीय समाजाच्या विकासामध्ये आणि आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणामध्ये नौदल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी बजावलेली भूमिका सर्वांसमोर उलगडली. जम्मू आणि काश्मीर ग्रामीण उपजीविका मिशनच्या सदस्य झुबेदिया बीबी यांनी प्रशासनाच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कशी मदत झाली यावर भाष्य केले. यावेळी छत्रपती संभाजीनगर शहरासाठी महिलांनी दिलेले योगदान अधोरेखित करणारे 'अवया' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. राज्यसभा खासदार डॉ. सोनल मानसिंग, डब्ल्यू २० च्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा उपस्थित होत्या.