इस्लाम धर्माच्या मते महिलाही मस्जिदमध्ये नमाज अदा करू शकतात. मात्र भारतीय उपखंडात पारंपारिक समजुतीमुळे महिला मस्जिदमध्ये जात नाहीत. इस्लामने मुस्लीम महिलेला मस्जिद प्रवेशाचा दिलेला हक्क मिळाला पाहिजे म्हणून अनेक महिला संघटना आवाजही उठवू लागल्या आहेत.
झारखंडमध्ये एक मस्जिद बांधली जात आहे. या मस्जिदचा विशेष हा की इथे केवळ महिलांना प्रवेश असणार आहे. जमशेदपूरला लागून असलेल्या कपालीच्या ताजनगरमध्ये मस्जिदचे काम जोरात सुरु आहे. या मस्जिदला 'सय्यदा झाहरा बीबी फातिमा' असे नाव देण्यात आले आहे.
ताजनगरमधील या महिला मस्जिदसाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नूरजमान यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या ते महिलांसाठी मदरसा चालवततात. त्यात पंचवीसहून अधिक मुस्लिम महिला धर्म आणि रोजचे व्यवहार यांचे शिक्षण घेत आहेत.
नमाजचे नेतृत्व आणि मस्जिदची देखभाल महिलांकडेच
ताजनगरमध्ये महिलांसाठी बांधण्यात येत असलेल्या या मस्जिदच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी महिलांच्याच हाती राहणार आहे. या मस्जिदत पुरुषांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी असेल. डॉ. नूरझमान यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा महिलांसाठी ही मस्जिद बांधण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा अनेकांनी विरोध केला होता, पण हे काम पूर्ण व्हायलाच हवे यावर माझा ठाम विश्वास आहे.
या वर्षाच्या अखेरीस काम पूर्ण होईल
'सय्यदा जहरा बीबी फातिमा' मस्जिदचे काम यावर्षी पूर्ण होणार आहे. यामध्ये महिलांना धार्मिक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. मस्जिदच्या बांधकामामुळे परिसरातील महिला खूश असल्याचे सांगितले जात आहे. मस्जिद खुली झाल्यावर आता महिलांनाही पुरुषांप्रमाणे मस्जिदत नमाज अदा करण्यासाठी जाता येईल. आता घरात नमाज अदा करावी लागणार नाही, असेही महिलांचे म्हणणे आहे.
एका वर्गाकडून मस्जिदला होतोय विरोध
अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेवाली हे जमशेदपूरमध्ये बांधण्यात येत असलेल्या मस्जिदच्या विरोधात असल्याचे सांगितले जात आहे. भारतातील बहुसंख्य लोक हनफी कायदेपंडीतांचे अनुयायी आहेत. महिलांची मस्जिद आणि महिला इमाम (नमाजचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती) या गोष्टी हनफी कायद्याप्रमाणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अहले हादिस या विचारधारेमध्ये मात्र महिलांना जमातसोबत नमाज अदा करण्याचे स्वातंत्र्य आहे. ते पुढे म्हणतात की, पैगंबर यांच्या काळात महिला नमाज अदा करण्यासाठी मस्जिदत जात असत, परंतु नंतर त्यांचे उत्तराधिकारी हजरत उमर फारुक यांनी त्यावर बंदी घातली होती. महिलांना उपद्रव होऊ नये हा या बंदीच्या मागचा तर्क होता, असे ते म्हणाले.