‘देने वाला जब भी देता देता छप्पर फाड के’ याची प्रचीती केरळच्या मल्लपूरममधील एका पालिकेत काम करणाऱ्या महिलांना आली आहे. कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करण्याचे काम करणाऱ्या अकरा महिलांना एक-दोन नव्हे तर दहा कोटी रुपयांचा ‘जॅकपॉट’ लागला.
विशेष म्हणजे सर्व महिलांनी २५-२५ रुपये गोळा करून अडीचशे रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले. याच तिकीटाने त्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आणले आहेत. पालिकेत काम करणाऱ्या अकरा महिला या नेहमीप्रमाणे फिकट रंगाचा ओव्हरकोट घालून आणि हातात रबराचे हातमोजे घालून परप्पनांगडी पालिकेच्या गोदामात आणून टाकलेला कचरा वेगळा करत होत्या.
त्याचवेळी दहा कोटी रुपयाची लॉटरी लागल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. केरळच्या लॉटरी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पैसा गोळा करून त्यांनी लॉटरीचे तिकीट घेतले होते.
कारण त्यांपैकी एकही जण अडीचशे रुपयांचे तिकीट घेऊ शकत नव्हती. या लॉटरीच्या माध्यमातून त्यांनी ‘मॉन्सून बंपर‘चे दहा कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. याची वार्ता शहरात पसरली आणि काल त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.
दुसऱ्यांदा लॉटरी लागली
नगरपालिकेच्या हरित कर्म सेना कन्सोर्टियमच्या अध्यक्षा शिजा म्हणाल्या, नशिबाने अतिशय गरजू महिलांना साथ दिली आहे. या महिला पुरस्कारविजेत्या असून त्या खूप मेहनती आहेत. आपल्या कुटुंबासमवेत राहताना त्या अनंत अडचणींचा सामना करत आहेत.
अनेक लोकांच्या डोक्यावर कर्ज आहे, विवाहयोग्य मुली आहेत आणि काही जणांवर उपचाराची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे या महिलांनी तिकीट घेण्यासाठी दुसऱ्यांदा पैसे गोळा केले होते. विजेत्यांपैकी एका महिलेने सांगितले की, आम्ही मागच्या वर्षी अशाच प्रकारे पैसा गोळा करून तिकीट खरेदी केले. त्या वेळी ओणम बम्पर तिकीट खरेदी केले. तेव्हा आम्ही ७५०० रुपये जिंकले.