‘‘माझे स्वतःचे घर नाही परंतु माझ्या सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातील लाखो माता-भगिनींना त्यांच्या हक्काचे घर मिळाले,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून, छोटाउदेपूर जिल्ह्यातील बोडेली येथे सुमारे पाच हजार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
बोडेली येथे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मी तुमच्या सर्वांबरोबर बराच काळ राहिलो असल्याने मी तुमच्या चेहऱ्यावरील समस्या समजू शकतो, आज माझ्या सरकारच्या वतीने देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी चार कोटी घरे बांधली आहेत, याचे मला समाधान आहे. या आधीच्या सरकारांप्रमाणे आम्ही केवळ घरे बांधून थांबलो नाहीत,
मागील सरकारांप्रमाणे ही घरे म्हणजे आमच्यासाठी केवळ संख्या नाही. आम्ही नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन घरे बांधली आहेत, त्याचप्रमाणे त्यांना सन्मानाचे जिवनमान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकराने आदिवासी, मागासवर्गीय, अनुसुचित जातीजमातींमधील बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार घरांची बांधणी केली. ’’
महिलांच्या नावांवर घरे
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही आदिवासींच्या गरजा लक्षात घेऊन गृहनिर्माण केले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये कोणत्याही दलालांना हस्तक्षेप करू दिला नाही. देशभरात नोंदणी करण्यात आलेल्या अनेक घरांची नोंदणी ही महिलांच्या नावे झालेली आहे. त्यामुळेच देशातील मागास वर्गातील, आदिवासी व गरीब महिला आता लाखो रुपये किंमत असलेल्या घरांच्या मालकीण म्हणजेच ‘लखपती भगिनी’ झाल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी यावेळी शिक्षण क्षेत्राशी निगडित विविध विकास कामांचे देखील उद्घाटन केले. यामध्ये स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळांची निर्मिती यांचा समावेश आहे.
तसेच त्यांनी यावेळी स्वामी विवेकानंद ज्ञानशक्ती निवासी विद्यालये, मुख्यमंत्री ज्ञानसेतू शिष्यवृत्ती यांसह अनेक योजनांची सुरुवात केली. शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘विरोधकांनी (आरक्षणावरून) राजकारण करावे, परंतु देशातील मुलांच्या भविष्याशी खेळू नये.’’
बंगा यांच्याकडून कौतुक
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा हे गुजरातमधील शिक्षण विभागाच्या ‘विद्या समिक्षा केंद्रा’च्या कामाने प्रभावित झाले असून, देशभरात अशा पद्धतीने केंद्र सुरू करावीत असे आवाहन त्यांनी केले. यासाठी जागतिक बँक अर्थसाहाय्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.’’