व्हिक्टोरिया गौरी मद्रास उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
victoria gauri
victoria gauri

 

नवी दिल्ली (पीटीआय): एल. व्हिक्टोरिया गौरी यांनी आज मद्रास उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायधीशपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. मद्रास उच्च न्यायालयाच्या वकिलांनी याचिकेत व्हिक्टोरिया या पदासाठी पात्र नसल्याचे म्हटले होते.
 
सुनावणीच्या वेळी न्यायाधीश संजीव खनना यांनी वकिल राम चंद्रन यांना विचारले, की तुम्हाला पात्रतेच्या मुदद्यावर आक्षेप आहे का? यावर ते म्हणाले, की त्यांच्या माइंडसेटबाबतच्या गोष्टी कॉलेजियमकडून लपविण्यात आल्या आहेत. यावर न्यायाधीश गवई म्हणाले, की कॉलेजियमला या गोष्टी माहित नसेल, असे नाही. कॉलेजियमकडून संस्था आणि न्यायाधीशांशी चर्चा केली जाते. राजकीय संबंध असल्याने नियुक्ती न करणे हे कारण नाही. एवढेच नाही तर माझी देखील राजकीय पाश्‍र्वभमी राहिलेली आहे. मात्र वीस वर्षांपासून मी त्यात नाही. रामचंद्रन यांनी त्यांनी अनेक न्यायाधीशांचे नाव घेतले आणि ही बाब राजकीय नसून हेट स्पीचशी संबंधित आहे. न्यायाधीश गवई म्हणाले, की आता त्या अतिरिक्त न्यायाधीश हेात आहेत. आपला कॉलेजियमवर विश्‍वास नाही, असे वाटत आहे. रामचंद्रन यांनी राजकीय पाश्‍र्वभमी असलेले न्यायाधीश आफताब आलम, न्यायाधीश रमा जॉईस, न्यायाधीश राजेंद्र सच्चर यांच्यासह अनेक न्यायाधीशांची नावे घेतली. अनेक जण कट्टरपंथीय संघटनेशी संबंधित राहिले हेाते. परंतु ते हेट स्पीच करणारे नव्हते. परंतु हे प्रकरण अनैतिक आणि द्वेषपूर्ण वाटत आहे. न्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले, की कॉलेजियमने सर्व पैलूंवर विचार करूनच निर्णय घेतला आहे.
 
२१ वकिलांचा विरोध
 
गौरी यांना न्यायाधीश बनवण्याच्या निर्णयाला मद्रास न्यायालयातील २१ वकिलांनी विरोध केला होता. वकिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून कॉलेजियमने व्हिक्टोरिया गौरींच्या नियुक्तीची केलेली शिफारस मागे घेण्याची विनंती केली होती. व्हिक्टोरिया गौरी या भाजपच्या नेत्या असल्याचा दावा या वकिलांनी केला होता.