मालेगावात महिला राज! शेख नसरीन महापौर, तर शान-ए-हिंद उपमहापौर

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
मालेगावाच्या महापौर शेख नसरीन आणि उपमहापौर शान-ए-हिंद यांचा सन्मान करताना इतर मान्यवर
मालेगावाच्या महापौर शेख नसरीन आणि उपमहापौर शान-ए-हिंद यांचा सन्मान करताना इतर मान्यवर

 

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महिला नेतृत्वाने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मालेगाव सारख्या मुस्लीमबहुल भागात महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही महत्त्वाच्या पदांवर मुस्लीम महिलांची निवड झाली आहे. इस्लाम (ISLAM) पार्टीच्या उमेदवार शेख नसरीन खालिद मालेगावच्या नवीन महापौर बनल्या आहेत. तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या नगरसेविका शान-ए-हिंद निहाल अहमद यांची वर्णी लागली आहे.

बहुमताचा आकडा आणि राजकीय समीकरणे मालेगाव महानगरपालिकेच्या ८४ सदस्यीय सभागृहात बहुमतासाठी ४३ हा आकडा आवश्यक होता. इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी एकत्र येत 'मालेगाव सेक्युलर फ्रंट'ची स्थापना केली होती. या आघाडीला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने सत्ता मिळवणे सोपे झाले. महापौर पदाच्या निवडणुकीत नसरीन खालिद शेख यांना एकूण ४३ मते मिळाली. यामध्ये इस्लाम पार्टीची ३५ , समाजवादी पार्टीची ५ आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांच्या मतांचा समावेश आहे.
 

शिंदे गटाला धक्का आणि भाजपची तटस्थ भूमिका 

या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत सहकारी असलेल्या भाजपने मतदानात सहभाग न घेता तटस्थ राहणे पसंत केले. मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या विरोधात उभे राहिलेल्या शिंदे गटाच्या उमेदवार लता घोडके यांना केवळ १८ मते मिळाली. एमआयएमच्या २१ आणि भाजपच्या २ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. इतर सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ही लढत थेट झाली होती.

उपमहापौरपदीही मुस्लीम महिलेचा विजय उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही सेक्युलर फ्रंटने बाजी मारली. समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार ॲड. निलेश काकडे यांचा पराभव केला. निहाल अहमद यांना ४३ मते मिळाली, तर निलेश काकडे यांना १८ मते प्राप्त झाली. या निवडणुकीतही एमआयएम आणि भाजपने मतदानापासून अंतर राखले.

नव्या पक्षाचा पहिल्याच निवडणुकीत करिष्मा 

मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडल्या होत्या. या निकालात इस्लाम पार्टीने ३५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. माजी आमदार शेख आसिफ शेख रशीद यांनी मागील वर्षी ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत इस्लाम या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी या पक्षाला अनेक स्तरातून टीकांना सामोरे जावे लागले होते. यावर ‘आवाज-द-व्हॉईस मराठी’ने माजी आमदार आसिफ शेख यांच्याशीसंवाद साधून सविस्तर आढावा घेतला होता. पक्षाच्या स्थापनेनंतर अवघ्या काही महिन्यांतच महानगरपालिकेवर आपली सत्ता स्थापन करण्यात शेख आसिफ यांना यश आले आहे.

कोण आहेत नव्या महापौर शेख नसरीन? 

नवनिर्वाचित महापौर शेख नसरीन या राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातील आहेत. त्या माजी आमदार आसिफ शेख यांचे बंधू शेख खालिद यांच्या पत्नी आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी मुंबईला 'बुर्केवाली महापौर' मिळेल असे विधान केले होते, मात्र मालेगावात 'इस्लाम' पार्टीने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. शेख नसरीन यांच्या निवडीमुळे मालेगावच्या राजकारणात शेख रशीद कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

रशीद कुटुंबाचा मालेगाववर दबदबा 

मालेगावच्या राजकारणात शेख रशीद आणि त्यांच्या कुटुंबाचा दशकांपासून प्रभाव आहे. शेख नसरीन या रशीद कुटुंबातील महापौर बनणाऱ्या तिसऱ्या व्यक्ती आहेत. यापूर्वी शेख रशीद आणि त्यांच्या पत्नी ताहिरा रशीद यांनीही मालेगावचे महापौरपद भूषवले आहे. २०२२ मध्ये शेख रशीद यांनी आपल्या कुटुंबासह काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, ज्यामुळे मालेगावातून काँग्रेसचे अस्तित्व संपले होते. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आसिफ शेख यांनी इस्लाम या नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter