मुस्लिम महिलांचे अधिकार आणि वास्तव : आवाज-ए-ख्वातीनच्या व्यासपीठावर उमटला परिवर्तनाचा स्वर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
‘आवाज-ए-ख्वातीन’ संवाद
‘आवाज-ए-ख्वातीन’ संवाद

 

नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये ‘आवाज-ए-ख्वातीन’ संस्थेमार्फत आयोजित 'भारतातील मुस्लिम महिला: अधिकार, वास्तव आणि आव्हाने' ही पॅनेल चर्चा केवळ एक औपचारिक संवाद नव्हती. ती समाजातील सत्य, विचार, कायदा आणि ओळखीच्या बहुआयामी पैलूंवर सखोल मंथन करणारे व्यासपीठ ठरली. मुस्लिम महिलांची स्थिती समजून घेण्यासाठी केवळ धोरणे किंवा धार्मिक दृष्टिकोन पुरेसा नाही. इतिहास, समाज, साहित्य आणि वर्तमान वास्तव एकत्र करून पाहण्याची गरज या चर्चेतून स्पष्ट झाली.

सत्राचे संचालन आवाज-ए-ख्वातीनच्या मानद निमंत्रक डॉ. बबली परवीन यांनी अतिशय कुशलतेने केले. त्यांनी भारतातील महिलांच्या व्यापक स्थितीवर महत्त्वाची मते मांडली. विद्वान आणि तत्ववेत्त्यांच्या विचारांचा आधार घेत डॉ. परवीन यांनी ऐतिहासिक आणि समकालीन संदर्भात चर्चा घडवून आणली. अशा प्रकारे लिंग, ओळख आणि न्याय या विषयांवर सूक्ष्म संवादासाठी एक व्यासपीठ तयार झाले.

कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सबा नकवी, इंडियन सोशल इन्स्टिट्यूटच्या प्रो. सबीहा हुसेन, CRDDP आणि AICWETE च्या अध्यक्षा डॉ. शबिस्तां गफार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड फिरदौस कुतुब वाणी यांनी आपले विचार मांडले. सर्व वक्त्यांनी स्वतःचे अनुभव आणि अभ्यासाच्या आधारावर मुस्लिम महिलांचे अधिकार, संसाधनांची कमतरता, सामाजिक अडथळे आणि शक्यतांवर सविस्तर चर्चा केली.

संवैधानिक अधिकार आणि जमिनीवरील वास्तव यामध्ये मोठी दरी असल्याचे चर्चेतून समोर आले. शिक्षण आणि रोजगारापर्यंत मर्यादित पोहोच, कायदेशीर जागरूकतेचा अभाव, सामाजिक दबाव आणि निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याचा अभाव हे सर्व घटक मुस्लिम महिलांच्या प्रगतीत अडथळे ठरत आहेत. महिलांना आपल्या अधिकारांची ओळख आहे, पण समाज आणि कुटुंबाच्या भीतीने त्या पुढे येऊ शकत नाहीत, असेही सांगण्यात आले.

बबली परवीन यांनी साहित्यिका महादेवी वर्मा आणि इस्मत चुगताई यांची उदाहरणे देत साहित्य हा समाजाचा आरसा असल्याचे म्हटले. साहित्यामुळे महिलांची खरी परिस्थिती समजण्यास मदत होते. दीर्घकाळापर्यंत महिलांना एक “इंसान” (मानव) म्हणून पाहण्याऐवजी केवळ “महिला” म्हणून पाहण्याच्या वृत्तीने त्यांची ओळख आणि स्वातंत्र्य मर्यादित केले आहे.

प्रो. सबीहा हुसेन यांनी स्पष्ट केले की, मुस्लिम महिलांकडे केवळ इस्लामिक नजरेतून पाहणे हा संकुचित दृष्टिकोन आहे. त्यांनी राईट्स (अधिकार), रिसोर्सेस (संसाधने), रिअॅलिटीज (वास्तव) आणि रोडब्लॉक्स (अडथळे) या चार आयामांच्या माध्यमातून प्रश्न समजून घेण्याची गरज व्यक्त केली. स्वतःचे अनुभव सांगताना त्यांनी नमूद केले की, बिहारमधून जेएनयूमध्ये पोहोचणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला होत्या. शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी हे स्थान मिळवले. प्रतिभेसमोर कोणतेही अडथळे टिकू शकत नाहीत, पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. शिक्षक केवळ शिकवणारे नसून ते मार्गदर्शक देखील असायला हवेत.

डॉ. शबिस्तां गफार यांच्या मते, मुस्लिम महिलांच्या परिस्थितीचे मूळ कारण धर्म नसून गरिबी आणि संसाधनांची कमतरता आहे. शिक्षणाचा खालावलेला दर्जा, मूलभूत सुविधांचा अभाव आणि वाढती आर्थिक विषमता ही मुख्य समस्या आहे. “गरीब अधिक गरीब होत आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत,” असे त्या म्हणाल्या. सरकारी धोरणे जमिनीवर प्रभावी ठरत नाहीत. मुस्लिम महिलांच्या शैक्षणिक संस्थांची कमतरता आणि त्या बंद होण्याच्या समस्येवर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

कायदेशीर पैलूंवर चर्चा करताना भारतात महिलांसाठी पुरेसे कायदे असल्याचे समोर आले. वैवाहिक अधिकार असोत वा इतर संरक्षण, कायद्यांची कमतरता नाही, मात्र त्यांची पोहोच आणि वापर मर्यादित आहे. अनेकदा घरात मुलींना निर्णय घेण्याचा अधिकार दिला जात नाही, मग ते शिक्षण असो, करिअर असो वा जीवनातील इतर महत्त्वाचे निर्णय.

फिरदौस कुतुब वाणी यांनी महिलांना आपला जोडीदार विचारपूर्वक निवडण्याचा सल्ला दिला. “असा जोडीदार निवडा जो तुम्हाला पाठिंबा देईल, केवळ परवानगी देणारा नको,” असे त्या म्हणाल्या. कुटुंबातील भावनिक आधार महत्त्वाचा असून महिलांनी आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पाऊल टाकावे.

ओळखीच्या प्रश्नावरही चर्चा झाली. हिजाब किंवा स्कार्फ हा ओझे नसून ती एक वैयक्तिक ओळख असल्याचे सांगण्यात आले. अनेक महिला आपली ही ओळख अभिमानाने स्वीकारतात आणि ती स्वतःची वैशिष्ट्य म्हणून मांडतात.

शिक्षण हेच रूढी आणि भेदभाव तोडण्याचे माध्यम असल्याचे चर्चेत स्पष्ट झाले. वक्त्यांनी “इक्वालिटी” (समानता) ऐवजी “इक्विटी” (न्याय्य संधी) यावर भर दिला. प्रत्येक महिलेला तिच्या परिस्थितीनुसार संधी मिळायला हवी. सामाजिक नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असून समाजात सकारात्मक संदेश आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

डॉ. गफार यांनी सांस्कृतिक विविधता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. धर्म ही कोणाची वारसा हक्क मालमत्ता नसून तो समजून घेण्याचा आणि आचरणात आणण्याचा विषय आहे. महिलांनी धार्मिक ज्ञान आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी.

केवळ महिला दिन किंवा इतर प्रतिकात्मक दिवस साजरे केल्याने बदल होणार नाही, तर सक्षमीकरणासाठी सातत्यपूर्ण आणि ठोस प्रयत्नांची गरज असल्याचे विचार मांडण्यात आले.

शेवटी बबली परवीन यांनी सर्व वक्ते, श्रोते आणि आवाज-ए-ख्वातीनच्या युसरा सिद्दीकी व तूबा खातून यांचे आभार मानले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित असलेले 'आवाज द व्हॉईस'चे एडिटर-इन-चीफ आतिर खान आणि खुसरो फाउंडेशनचे निमंत्रक हाफिजुर रहमान यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

संवाद सत्रात सहभागींनी सक्रिय सहभाग घेतला. मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण, जागरूकता, कायदेशीर पोहोच, सामाजिक पाठिंबा आणि धोरणात्मक सुधारणा या सर्वांवर एकत्र काम करण्याची गरज असल्याचे एकमत झाले. हा कार्यक्रम केवळ संवादाचे माध्यम बनला नाही, तर भविष्यातील दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा प्रयत्न ठरला.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter