पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२० जुलै) मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल आणि दोन महिलांच्या अत्याच्याराबाबत व्हायरल व्हिडिओबद्दल दु:ख व्यक्त केले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज जेव्हा आपण या लोकशाहीच्या मंदिरात श्रावनच्या पवित्र महिन्यात भेटत आहोत. मला विश्वास आहे की सर्व खासदार मिळून लोकांच्या जास्तीत जास्त कल्याणासाठी याचा उपयोग करतील आणि खासदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील."
ते पुढे म्हणाले, "मी देशाला आश्वासन देतो की, मणिपूर प्रकरणी कोणत्याही दोषींना सोडले जाणार नाही. मणिपूरच्या मुलींसोबत जे घडले ते कधीही माफ न करणारे कृत्य आहे."
शेवटी पंतप्रधान म्हणाले, "मला वेदना आणि संताप आहे. मणिपूरमधील घटना आपल्यासमोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करावा - विशेषत: महिलांच्या सुरक्षेसाठी!”
नेमकं काय घडलं?
मणिपूर सध्या वांशिक हिंसाचाराच्या विळख्यात आहे, परंतु आता दोन महिलांच्या विवस्त्र व्हिडिओवरून मणिपूरमध्ये तणाव पसरला आहे. माहितीनुसार हा व्हिडिओ ४ मे चा आहे आणि दोन्ही महिला कुकी समुदायातील आहेत, तर महिलांची विवस्त्र परेड करणारे पुरुष हे सर्व मेईतेई समुदायातील आहेत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी संघटना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने केली आहे.