राज्य विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर.
महिलांना समजून घेण्यासाठी काही वेळा समाज कमी पडत असल्याची चिंता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
विधानपरिषदेचा शतकमहोत्सव सोहळा मंगळवारी मुर्मू यांच्या उपस्थितीत विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला. या शतकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त गेल्या सहा वर्षांतील उत्कृष्ट विधीमंडळपटू, उत्कृष्ट वक्ते यांचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते झाला. 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
देशातील आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांना योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, असे सांगत त्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचेराष्ट्रपतींनी सांगितले. "महिलांकडे बघण्याची दृष्टी काही ठिकाणी संकुचित दिसते. ती बदलण्याची, सुधारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आज महिला जे काही सोसत आहेत, ते त्यांना पुढे जाऊन भोगावे लागू नये." असे राष्ट्रपती म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांचे कौतुक त्यांनी केले.
मुर्मू म्हणाल्या, की ही वीरमाता जिजाबाई भोसले यांची भूमी आहे. महिलांच्या सामाजिक प्रगतीला दिशा देण्याच्या पंक्तीत सावित्रीबाई फुले यांचे वंदनीय स्थान आहे. देशाच्या पहिल्याराष्ट्रपती होण्याचा मान महाराष्ट्राच्याच प्रतिभा पाटील यांना जातो, हे उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राच्या मुली देशाचा आणि राज्याचा गौरव निरंतर वाढवतील, असा मला विश्वास आहे."
या कार्यक्रमात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष नमन करतो. सुप्रसिद्ध कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या भावनांना आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगत राष्ट्रपतींनी 'बहुत असो संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' या ओळींचा उल्लेख केला. भाषणाच्या शेवटी त्यांनी कवी राजा बढे यांच्या'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताच्या ओळीही म्हटल्या.
राष्ट्रपती आज नांदेड, उदगीरला
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी (ता. ४) लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये येत असून त्यांच्या उपस्थितीत तेथील बुद्धविहारचे लोकार्पण आणि महिलांचा आनंद मेळावा होत आहे. राष्ट्रपती पहिल्यांदाच येथे येत असल्याने नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, मुर्मू सायंकाळी सव्वापाचला नांदेड येथील सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतील.
लोकशाही मूल्यांना शक्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे विधान परिषदेचे सदस्य होते.देशाला दिशा देणारे त्यांच्यासारखे व्यक्तित्व दुर्लभ आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्या. महादेव गोविंद रानडे, सर फिरोजशहा मेहता, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारख्या अनेक महापुरुषांनी विधान परिषदेची शोभा वाढवली आहे. विधान परिषदेने लोकशाही मूल्यांना शक्ती दिली आहे," असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "शतकमहोत्सवी वर्ष साजरा करणारे विधान परिषद हे देशातील सर्वांत जुने सभागृह असून, या सभागृहाचा एक गौरवशाली इतिहास आहे.भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक संस्थांपैकी महाराष्ट्रातील विधानपरिषद आहे."
विधान परिषदेच्या उपसभापती, डॉ. नीलम गोन्हे म्हणाल्या, "विधान परिषदेच्या १०० वर्षांचा उत्सव आपण साजरा करत आहोत. गोपाल कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, वि. स. पागे यांसारख्या विधान परिषद सभासदांनी राज्याला आणि देशाला दिशा देण्याचे काम केले आहे."