ज्येष्ठ उर्दू साहित्यिक डॉ. सादिका नवाब यांना साहित्य अकादमी

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 3 Months ago
डॉ. सादिका नवाब
डॉ. सादिका नवाब

 

जयवंत चव्हाण 
ये खुशबू प्यार की हैं जिसने हम को घेर लिया ... फुलों की तरह से देखो महक गये हैं हम ... ' अशीच काहीशी अवस्था सध्या डॉ.सादिका नवाब 'सहर' यांची झाली आहे. हे शब्दही त्यांचेच. साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांचा विश्वास बसेना. सर्व काही स्वप्नवत वाटत होते त्यांना. साहित्याच्या प्रांतातील देशातील प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या 'राजदेव की अमराई' या उर्दू भाषेतील कादंबरीला मिळाला आहे. प्रसिद्ध लेखिका कुरतुलऐन हैदर यांच्यानंतर जवळजवळ ५६ वर्षांनी उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. सादिका नवाब या दुसऱ्या लेखिका आहेत. लहानपणापासून त्यांनी विपुल वाचन केले. पण तशा प्रकारचे काही लिहायचे नाही, असे त्यांनी ठरवले होते. काहीतरी नवीन लिहायचे, असा त्यांचा ध्यास होता.
 
सादिका यांची 'कहानी कोई सुनाओ, मिताशा' ही पहिली कादंबरी २००८ मध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीने उर्दू साहित्यविश्वात त्यांचे खूपच कौतुक झाले. कादंबरीची लोकप्रियता केवळ उर्दूपुरती मर्यादित राहिली नाही. तिचे हिंदी, मराठी, तेलुगू, इंग्रजीमध्ये भाषांतरही झाले. प्राध्यापक डॉ. मोहम्मद शाकीर शेख यांनी ती मराठीत आणली. २०१६ मध्ये आलेल्या 'जिस दिने से ... ' या कादंबरीनेही अनेक पुरस्कार मिळवले. एका मुलाची डायरी आहे ही. तुटलेले नातेसंबंध, विखुरलेल्या घरांचे मनोगत आहे. त्यात ... एका मुलाची आई घर सोडून जाते आणि मग त्याची त्या दिवसापासून काय स्थिती होते, हा प्रवास सादिका यांनी संवेदनशीलतेने मांडला आहे.

एखादा विचार मनात आला की काही मुद्दे काढून ठेवण्याची सादिका यांची सवय आहे. मग त्यासाठी कुठेतरी खास जागा शोधायची आणि त्यातून कथेचा ढाचा तयार करायचा, अशी त्यांची पद्धत. 'राजदेव की अमराई चा जन्मप्रवासदेखील खूप छान आहे. एकदा ट्रेन प्रवासात कोणा सहप्रवाशाने सांगितलेली त्याची जीवनकहाणी त्यांना आवडली आणि त्यावर काम सुरू झाले.
 
अमराईचा हा प्रवास कोकणातला, चिपळूगमधला आहे. क्षेत्र परशुरामाच्या भूमीतील ही कथा आहे. एक पूर्ण समाज त्यातून त्यांनी उभा केला आहे. तिथली संस्कृती, राहणी त्यात मांडली. चार पिढ्यांचा प्रवास चितारला आहे. प्रत्येक पिढीमध्ये मूल्यांचा प्रवास कसा होतो, हे या कादंबरीतून दिसते. दर वेळी असे म्हटले जाते की, मूल्य, संस्कृती घसरत चालली आहे; पण ही सामाजिक घुसळण आहे आणि ती प्रत्येक कालखंडात होत असते, असा विचार सादिका मांडतात. त्यातून पैसा कसा महत्त्वाचा ठरतो, चांगले-वाईट, तरुण आणि वृद्ध, ग्रामीण आणि शहरी असा सांस्कृतिक बंधाचा कालपट सादिका उभा करतात. या कादबरीचा चेहरा पुरुषप्रधान असला तरी अनेक स्त्री पात्रे त्यात आहेत.
 
आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे डॉ. सादिका यांचा जन्म झाला. मुंबईत त्यांचे लहानपण गेले. तेव्हापासूनच वाचनाची आवड होती. तो वारसा आईवडिलांकडून त्यांना मिळाला होता. पाचवीत असताना त्यांनी पहिली कविता केली होती. तेव्हा शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले होते. नंतर अंजुमन स्कूल, सोफिया महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. उर्दू-फारसी, इंग्रजी आणि हिंदी या विषयांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. 'गझल शिल्प और संवेदना, विशेष संदर्भ - दुष्यंत कुमार' या विषयावर मुंबई विद्यापीठातून पीएच. डी. मिळवली. लग्नानंतर त्या खोपोलीत स्थिरस्थावर झाल्या. त्यांचे लेखन पाहून पती, सासरे यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. खोपोलीतील के. एम. सी. महाविद्यालयातून हिंदी विभागप्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या.
 
कादंबरी, कथा, गजल, कविता, नाटक, बालनाट्य असे विविध प्रकारचे लेखन डॉ. सादिका नवाब यांनी केले आहे. सादिका यांचे साहित्य कधीच कल्पनाविलास नव्हते. जे वास्तव त्यांनी समाजात पाहिले त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटले. साहित्य अकादमी पुरस्कारानंतरही 'हा एक पडाव आहे, मंजील नाही' असे त्या मानतात.
-जयवंत चव्हाण