‘महिलांच्या मुलभूत प्रश्नांकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो’

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
फतिमाबी शेख महिला मंच आणि मदत केंद्राच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित चर्चासत्र व परिसंवाद कार्यक्रमात बोलताना जहाँआरा अमीन व उपस्थित मान्यवर.
फतिमाबी शेख महिला मंच आणि मदत केंद्राच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित चर्चासत्र व परिसंवाद कार्यक्रमात बोलताना जहाँआरा अमीन व उपस्थित मान्यवर.

 

पुणे : ‘‘महिलेला आहे त्या परिस्थितीत संसाधने उपलब्ध करून द्यायला हवीत, महिलांनी शांत न बसता बोलक झाले पाहिजे, बोलक झाले तर प्रगतीकडे चालतं होईल. प्रत्येक घटकातील महिलांचा संघर्ष तिच्या परिस्थितीनुसार वेगवेगळा आहे,’’ असे मत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित चर्चासत्र व परिसंवाद कार्यक्रमात उपस्थित महिलांनी व्यक्त केले.


मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या सत्यशोधक फतिमाबी शेख महिला मंच आणि मदत केंद्राच्यावतीने बुधवारी (ता. ८) मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला अधिकार, महिला आणि मी’ या विषयावर एस.एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे चर्चासत्र व परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी चर्चासत्रात महिलांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला.


अनेक घरात मुलींच्या प्रमाणात मुलांचे पारडे जड असते. संविधानात व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. परंतु, विवाह करतेवेळी मुलींना ते स्वतंत्र मिळतं का? मुलींच्या बाबतीत एकच विचार कायम डोक्यात ठेवला जातो, तो म्हणजे, मुलीचं लग्न या पलीकडे जाऊन चूल आणि मूल या चौकटीच्या बाहेर जाऊन मुलीकडे बघायला हवं, असा सूर यावेळी उमटला.


मुलींच्या लग्नावेळी तिची मानसिकता लक्षात घ्यायला हवी. मुलींनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केला तर राजकीय चष्म्यातून त्यांच्याकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील मुलींची शैक्षणिक गळती आणि शहरी भागात कामाच्या ठिकाणी मिळणारी दुय्यम वागणूक अशी बरीच आव्हाने मुलींसमोर आहेत. अलीकडच्या काळात बोलणाऱ्या स्रिया टोचतात. सामाजिक व राजकीय पातळीवर मुस्लिम समाजाला सोबत घ्यायला हवे. महिलांना त्यांचे प्रश्न काय आहेत याची माहिती असावी, अशा अनेक ज्वलंत समस्या समोर ठेवून चर्चासत्र झाले.


‘मुस्लीम महिलांचे समाजातील स्थान’ या विषयावर बोलताना मुक्त पत्रकार हिनाकौसर खान म्हणाल्या, “महिलांसंदर्भातील अनेक नरेटीव्ह  ठरवलेले आहेत आणि अंधपणे आजही आपण तेच फॉलो करत आहोत. त्या पलीकडे तिच्या शिक्षणाचे, रोजगाराचे, आरोग्याचे काही प्रश्न असू शकतात याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा संबंधित स्त्री कोणत्या जातीतून किंवा धर्मातून आहे यावरून तिच्या प्रश्नांकडे बघितले जाते. अल्पसंख्याक समाजातील स्त्रीकडे नेहमी पिडीत म्हणूनच बघितले जाते. ती बुरख्यात आहे म्हणजे ती अत्यंत दयनीय अवस्थेत आहे, असा लोकांचा समज असतो. त्याचप्रमाणे मुस्लीम पुरुषाला शोषित म्हणून त्याची प्रतिमा मलीन केली जाते. तो दृष्ट आहे, असे त्याच्याकडे बघितले जाते.”         


“समाजात अनेकवेळा महिला आणि पुरुष यांच्यात भेदभाव केला जातो. महिलांना डावलून पुरुषांना झुकते माप दिले जाते. असे होता कामा नये. महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीचे समजावे,” असे मत समिना पठाण जाधव यांनी व्यक्त केले. तर,मिनाज लाटकर म्हणाल्या कि, “मुस्लिम महिलांची प्रत्येक ठिकाणी म्हणजे राजकारण, शिक्षण, कला, साहित्य, सिनेमा, नाटक ते सामाजिक कार्यक्रम अशी स्पेस तयार व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरचेचे आहे. मुस्लिम महिला आणि समाज यांना सामावून घेण्यासाठी ठरवून प्रयत्न करायला हवे.”


हिनाकौसर खान, बेनझीर तांबोळी, अप्सरा आगा, मिनाज लाटकर, जहाँआरा अमीन, श्रीरूपा बागवान, समिना पठाण-जाधव यांनी उपस्थितांशी परिसंवाद साधला. यावेळी डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, अशोक धिवरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी केले. तर अप्सरा आगा यांनी आभार मानले.