अफगाणिस्तान देश ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने तिथल्या नागरिकांवर कित्येक जाचक अटी आणि कायदे लागू केले आहेत. आधी मुलींना शाळेत जाऊ देणार, असं म्हणणाऱ्या तालीबानने काही महिन्यांतच पलटी खाल्ली होती. त्यानंतर आता आणखी एक फतवा तालिबानने काढला आहे.
अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून आता बंद होणार आहेत. देशाची राजधानी काबुलसह अन्य प्रांतांमध्येही हा नियम लागू करण्यात आला आहे. तालिबानच्या मंत्रालयातील प्रवक्ता मोहम्मद आकिफ महाजरने टोलो न्यूजला याबाबत माहिती दिली.
तालिबानच्या नैतिकता मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतला आहे. काबुल नगरपालिकेला याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच, महिलांचे ब्युटी सलूनचे असलेले लायसन्स रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आम्ही उपाशी मरायचं का?
तालिबानच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. जर घरातील पुरूष कमावता असेल, तर आम्हाला बाहेर पडता येत नाही. जर घरातील पुरूष कमावता नसेल, तर आमचं कमाईचं साधनही आता काढून घेतलं आहे. या परिस्थितीमध्ये आम्ही उपाशी मरायचं का? असा सवाल या महिलांनी विचारला आहे.
मेकअप आर्टिस्ट रेहान मुबारिज म्हणतात, की "इथले पुरूष बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीमध्ये महिलांनाच घर चालवावं लागत आहे. यासाठी त्या ब्युटी पार्लरमध्ये काम करतात. मात्र आता महिलांचे पार्लर बंद केले आहेत, तर आम्ही काय करायचं?"
महिलांवर निर्बंध
तालिबानने महिलांच्या शिक्षणावर, सरकारी ऑफिसमध्ये काम करण्यावर, पुरूषांसोबत काम करण्यावर बंदी लागू केली आहे. तसंच पार्क, सिनेमा आणि इतर मनोरंजक ठिकाणी जाण्यास देखील महिलांना बंदी आहे.