स्वराज्यविस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगर सातारा येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साहात प्रारंभ झाला आहे. गुरुवारपासून चार दिवस चालणाऱ्या या सारस्वतांच्या मेळ्याचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. तर आज या संमेलनाचा सलग तिसरा दिवस सुरु आहे.
उद्घाटन समारंभ
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते गुरुवारी ध्वजारोहण करण्यात आले आणि साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी पोलीस बँडने राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन मानवंदना दिली. या प्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या अध्यक्ष तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते.
संमेलनात मुख्य मंडपाबरोबरच ग्रंथप्रदर्शन, कविकट्टा, गझलकट्टा, बालकुमार वाचनकट्टा, प्रकाशन कट्टा असे वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. त्यासाठी आकर्षक मंडप उभारण्यात आले आहेत. दररोज विविध साहित्यिक कट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे. ध्वजारोहणानंतर तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तसेच बालकुमार वाचनकट्ट्याचे उद्घाटन शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या बालकुमार व्यासपीठाच्या उद्घाटनावेळी बालगोपाळांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
साहित्यिकांची मांदियाळी
गझल कट्ट्याचे उद्घाटन संदीप शहा यांनी केले. तर, बा. सी. मर्ढेकर कविकट्ट्याचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यास कवी आणि साहित्य रसिकांनी मोठी हजेरी लावली होती. प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. संमेलनात या कट्ट्यावर ११० हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन होणार असून यामध्ये ब्रेल लिपीतील एका पुस्तकाचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातील संत परंपरेपासून ते थोर साहित्यिकांपर्यंत आणि वारसा-परंपरांपासून ते निसर्ग रक्षणापर्यंत अशा विविध विषयांना कवेत घेत सातारा मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ दिंडीने शहरात साहित्याचा जागर घडवला. या दिंडीमध्ये मान्यवरांसह हजारो विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी सहभागी झाले होते.
'स्त्री चळवळीची ५० वर्षे'मध्ये हिनाकौसर खान साधणार संवाद
छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी साताऱ्यात दिमाखात सुरु असलेल्या या संमेलनात आज साहित्यिक हिनाकौसर खान संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत डॉ. गीताली वि. म., सुचिता खल्लाळ, प्रमोद मुनघाटे, डॉ. सविता मोहिते, डॉ. गायत्री शिरोळे, डॉ. संध्या अणवेकर, डॉ. अंजली ढमाळ, नमिता कौर हे देखील आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.
हिनाकौसर खान यांच्याविषयी…
हिनाकौसर खान गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. संवेदनशील पत्रकार आणि लेखिका म्हणून महाराष्ट्रभर त्या ख्यातकिर्त आहेत. मुस्लिम समाजाचे अंतरंग लेख, मुलाखती, ललित कथांच्या माध्यमातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तिहेरी तलाक विरोधात लढा देणाऱ्या मुस्लीम महिलांच्या व्यथा मांडणारा ‘तीन तलाक विरुद्ध पाच महिला’ ही अभ्यासपूर्ण पुस्तिका, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांशी संवाद साधून ‘धर्मारेषा ओलांडताना’ हा मुलाखतींचा संग्रह या त्यांच्या महत्त्वाच्या कृतींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडेच त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. हिंदू-मुस्लिमांना शांततामय सहजीवनाचा सम्यक मार्ग दाखवणाऱ्या या पुस्तकाचे नाव ‘इज्तिहाद’ असे आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेली 'इत्रनामा' ही त्यांची कादंबरीही सध्या गाजते आहे.