डिजिटल इंडियाची चावी महिलांच्या हाती

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
 महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी
महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी

 

छत्रपती संभाजीनगर : आपला देश आता डिजिटल इंडिया म्हणून ओळखला जात असून, या नव्या बदललेल्या भारताची चावी महिलांच्या हाती आहे, असे मत केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी व्यक्त केले. महिला-२० परिषदेत होणारे विचार मंथन जगाला पुढे नेणारे ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


महिला-२० परिषदेचे उद्‍घाटन सोमवारी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे इराणी यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जी-२० परिषदेचे शेरपा अमिताभ कांत, महिला-२० परिषदेच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, डॉ. गुल्डेन तुर्कतन, सहकारमंत्री अतुल सावे आदींची उपस्थिती होती.


भाषणाची मराठीतून सुरवात करताना इराणी पुढे म्हणाल्या, की महिला-२० परिषदेची सुरवात महाराष्ट्रातून होत आहे. महाराष्ट्रात मराठा साम्राज्य होते. मराठा साम्राज्याची ओळख राजमाता जिजाऊ यांच्यामुळे होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या या परिषदेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या परिषदेसाठी तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल लैंगिक समानता, शिक्षण आणि कौशल्य विकास आणि हवामान बदलावरच्या उपाययोजनेवर कृती समूहात महिला आणि मुलींचा परिवर्तनकर्त्या म्हणून समावेश, असे पाच प्राधान्यक्रम ठरवण्यात आले आहेत. भारतात सहा लाख २२ हजार खेडी आहेत. त्यात आठ कोटीपेक्षा जास्त महिला या शेती व्यवसायाशी निगडित आहेत. त्यांनीदेखील आता डिजिटल इंडियाची कास धरली आहे. सध्या देशात आरोग्य, उद्योग, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. भारत हा महिला सक्षमीकरणासाठी अग्रेसर आहे. जगात ३० लाखापेक्षा अधिक महिला या सक्रिय राजकारणात आहेत. त्यापैकी १४ लाख महिला या भारतातील आहेत. दोन कोटी ३० लाख महिलांनी मुद्रा लोनचा लाभ घेत स्वत:चा उद्योग सुरु केला. या परिषदेत जगभरातून आलेल्या महिलांच्या विचारातून देशाच्या प्रगतीसाठी अनेक मुद्दे मिळतील, अशी अपेक्षाही स्मृती इराणी व्यक्त केली.


१४ लाख महिलांनी राजकीय अस्तित्व सिद्ध केले आहे : कांत

अमिताभ कांत म्हणाले, की २०१५ पूर्वी १९ टक्के नागरिकांची बँक खाती होती. आता ती ७६ टक्क्यांच्या पुढे गेली आहेत. विशेष म्हणजे, यातील निम्मी खाती महिलांचे असून, त्या ऑनलाइन पद्धतीने ते खाते वापरतात. १४ लाख महिलांनी देशात आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यामुळे महिलांना सोबत घेतल्याशिवाय देशाचा आणि जगाचा विकास होणार नाही. कोरोनानंतर जगातील २० कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. १० कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एक तृतीयांश देशात मंदी आहे. मात्र, भारत या संकटापासून दूर आहे. जनधन योजनेअंतर्गत भारतात ४८ कोटी बँक खाती उघडण्यात आली, असेही कांत यांनी सांगितले.