एअर इंडियाच्या ताफ्यात येणार २५० नवी विमाने

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
बोईंग विमान
बोईंग विमान

 

 एअरबस’सोबत ऐतिहासिक करार, ‘टाटा सन्स’कडून घोषणा

टाटा उद्योग समूहाच्या मालकीची ‘एअर इंडिया’ ही कंपनी ‘एअरबस’कडून अडीचशे विमाने खरेदी करणार असून त्यामध्ये आकाराने मोठ्या ४० विमानांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विमाने खरेदी करण्याची एअर इंडियाची मागील सतरा वर्षांहून अधिक काळातील पहिलीच वेळ आहे. कंपनीची सूत्रे टाटा उद्योगसमूहाकडे गेल्यानंतरचा हा पहिलाच मोठा व्यवहार आहे. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या कराराबाबतची माहिती दिली. व्हर्च्युअलीच पार पडलेल्या या व्यवहाराप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन हे देखील उपस्थित होते. यातील मोठी विमाने ही दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणासाठी वापरण्यात येतील.


‘एअर इंडिया’ची मालकी जानेवारी २०२२ मध्ये टाटा उद्योग समूहाकडे आल्यापासून या कंपनीला आर्थिक गर्तेमधून बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहेत. एअर इंडियाने शेवटची ऑर्डर ही १११ विमानांची दिली होती. त्यामध्ये ६८ विमाने ‘बोईंग’ या कंपनीकडून तर ४३ ‘एअरबस’कडून खरेदी करण्यात आली होती. हा सगळा व्यवहार १०.८ अब्ज डॉलरचा होता. २००५ मध्ये याबाबतची ऑर्डर देण्यात आली होती.


भारत- फ्रान्स मैत्रीचे प्रतिबिंब

‘एअरबस’ आणि ‘एअर इंडिया’मध्ये झालेल्या या खरेदी व्यवहाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. देशाच्या विस्तारत जाणाऱ्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राला येत्या पंधरा वर्षांमध्ये आणखी दोन हजार विमाने लागतील असे त्यांनी म्हटले आहे. आज झालेला खरेदी करार ऐतिहासिक असून भारत आणि फ्रान्सदरम्यान अधिक घट्ट झालेल्या द्विपक्षीय संबंधांचे प्रतिबिंब यामध्ये उमटलेले दिसते. विमान वाहतूक क्षेत्राचे यश आणि आशा आकांक्षाही यात दिसून येतात असे मोदी म्हणाले.


गुलओमे फौरी या एअरबसच्या सीईओनी या विमान खरेदीवर त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “‘एअर इंडिया’च्या पुनरुत्थानाची गाथा लिहिण्यामध्ये ‘एअरबस’चा देखील समावेश असेल. हा आमच्यादृष्टीने एक ऐतिहासिक क्षण आहे.”



भविष्यात व्याप वाढणार

मागील आठ वर्षांमध्ये देशातील विमानतळांची संख्या ७४ वरून थेट १४७ वर गेली आहे. ‘उडान’सारख्या योजनेच्या माध्यमातून देशातील दुर्गम भाग हवाई सेवेच्या माध्यमातून परस्परांशी जोडण्यात येत आहेत. यामुळे जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला देखील बळ मिळते आहे. भविष्यामध्ये भारत नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील तिसरी सर्वांत मोठी बाजारपेठ बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


अशीही खरेदी

- ४० ए-३५० (मोठी विमाने)

- २१० छोटी विमाने (१४०- ए ३२०, ७०- ए ३२१ नियो)