अब्जाधीश उद्योजक जॅक मा चीनला परतले

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
अलिबाबा या प्रसिद्ध ई - कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा
अलिबाबा या प्रसिद्ध ई - कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा

 

बीजिंग : गेल्या तीन वर्षांपासून गायब झालेले अलिबाबा या प्रसिद्ध ई - कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा (वय ५८) हे पुन्हा मायदेशी परतले आहेत. येथील माध्यमांच्या वृत्तानुसार परदेशात एक वर्षापेक्षा जास्त काळ राहून जॅक मा चीनला परत आले आहेत.

गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक ठिकाणी त्यांचे दर्शन क्वचितच झाले होते. आता अचानक हांगझोऊमधील शाळेत ते पुन्हा दिसले आहेत. जॅक मा यांनी २०२०मध्ये चीनमधील आर्थिक नियमकांवर टीका केली होती. त्यानंतर ते ‘गायब’ झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. सार्वजनिक जीवनातही ते दिसेनासे झाले होते.

एक वर्षांपेक्षा जास्त काळ परदेशात वास्तव्य केल्यानंतर ते नुकतेच चीनला परतले आहेत, असे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. चीनला परतण्याच्या प्रवासात जॅक मा यांनी सिंगापूरमध्ये काही काळ थांबून मित्राची भेट घेतली. ‘आर्ट बासेल’ या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनातही त्यांनी सहभाग घेतला.

कृषी तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी जॅक मा हे वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करत आहेत, अशी एक शक्यता व्यक्त होत आहे. पण काही वर्षांत ते सार्वजनिक ठिकाणी ते का दिसले नाहीत, याबद्दल कोणताही माहिती दिली गेलेली नाही. चीनमधील बड्या उद्योगपतींमधील एक जॅक मा हे २०२१ पासून देशातून अचानक बेपत्ता झाले. काही महिन्यानंतर जपान, ऑस्ट्रेलिया व थायलंडसारख्या देशांत ते दिसले.

समस्या सोडविण्यासाठी ‘एआय’चा वापर करा
अब्जाधीश उद्योजक म्हणून नावारूपाला येण्यापूर्वी ते जॅक मा हे इंग्रजीचे शिक्षक होते. यंगू शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते आज दिसले. ‘चॅटजीपीटी आणि तत्सम तंत्रज्ञान ही कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) केवळ चुणूक आहे. ‘एआय’वर नियंत्रण न ठेवता समस्या सोडवण्यासाठी उपयोग केला पाहिजे,’’ असे त्यांनी यावेळी सांगितले. या शाळेला अलिबाबा फाउंडर्सतर्फे २०१७ पासून निधी दिला जात आहे.