अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कथित आक्रमणाचा भारतातील पाच प्रमुख डाव्या पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या पक्षांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून याला 'अमेरिकन आक्रमकता' म्हटले आहे. लॅटिन अमेरिकेतील या देशाच्या समर्थनार्थ देशभरात निदर्शने करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अमेरिकेने लष्करी कारवाई केल्याचे दावे आणि व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक तणाव वाढला असतानाच डाव्या पक्षांनी हे पाऊल उचलले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), सीपीआय (एमएल) लिबरेशन, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (आरएसपी) आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांनी हे संयुक्त निवेदन जारी केले आहे. अमेरिकेचा हा हल्ला म्हणजे 'संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उघड उल्लंघन' असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलातील अफाट तेलसाठ्यावर ताबा मिळवणे आणि या भागात आपले वर्चस्व वाढवणे हाच अमेरिकेचा (वॉशिंग्टनचा) मुख्य उद्देश असल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेलाचा साठा ताब्यात घेण्याबाबत केलेल्या विधानावर आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी क्षेत्रातील इतर देशांनाही लक्ष्य करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर डाव्या पक्षांनी कडक टीका केली आहे. अमेरिकेच्या 'नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी २०२५' प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच ही विधाने आली आहेत. ही विधाने 'मन्रो डॉक्ट्रीन'च्या विस्तारीत अर्थावर आधारित असून ती आक्रमक आणि साम्राज्यवादी परराष्ट्र धोरण दर्शवतात, असे डाव्यांनी म्हटले आहे.
व्हेनेझुएलातील जनतेने आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षसाठी मोठ्या संख्येने एकत्र येण्यास सुरुवात केल्याचे डाव्या पक्षांनी तेथील बातम्यांचा हवाला देत सांगितले. व्हेनेझुएलातील जनतेला 'मनापासून पाठिंबा' जाहीर करत डाव्यांनी देशातील सर्व शांतताप्रेमी आणि साम्राज्यवादविरोधी शक्तींना रस्त्यावर उतरून निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
"आम्ही सर्व डावे पक्ष अमेरिकेच्या आक्रमकतेविरोधात आणि लॅटिन अमेरिकेतील जनतेच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनाचे आवाहन करतो," असे निवेदनात म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
भारत सरकारनेही आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेच्या या कृतीचा निषेध करावा, असे आवाहन पक्षांनी केले आहे. राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि स्वयंपूर्णतेच्या रक्षणासाठी भारताने 'व्हेनेझुएलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे', अशी मागणी त्यांनी केली आहे.
याआधी सीपीआय (एमएल) लिबरेशनने एक स्वतंत्र पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी या स्थितीला 'गुन्हेगारी आक्रमक युद्ध' असे संबोधले आहे. काराकसवर हवाई हल्ले आणि लष्करी आक्रमण झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. लॅटिन अमेरिका आणि पश्चिम आशियातील अमेरिकेच्या भूतकाळातील हस्तक्षेपांचे दाखले निवेदनात देण्यात आले आहेत. सत्तांतर घडवून आणण्यासाठी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करण्यासाठी अमेरिका 'जुनीच खोटी कारणे' पुढे करत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.
या संयुक्त निवेदनावर सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा, सीपीआय (एम) चे सरचिटणीस एम. ए. बेबी, सीपीआय (एमएल) लिबरेशनचे दीपांकर भट्टाचार्य, आरएसपीचे मनोज भट्टाचार्य आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे जी. देवराजन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आवाहनानंतर आगामी काही दिवसांत भारतातील विविध शहरांमध्ये निदर्शने होण्याची शक्यता आहे. यामुळे व्हेनेझुएलाभोवती निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय संकटाला आता देशांतर्गत राजकीय वळण मिळणार आहे.