स्मृती इराणी यांच्यासह जागतिक राजनैतिक अधिकाऱ्यांकडून दाऊदी बोहरांच्या 'अलजामिया-तुस-सैफिया' अकादमीचे कौतुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईतील 'अलजामिया-तुस-सैफिया' या प्रतिष्ठित अकादमीला भेट देतानाचे क्षण
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईतील 'अलजामिया-तुस-सैफिया' या प्रतिष्ठित अकादमीला भेट देतानाचे क्षण

 

आवाज द व्हॉइस मराठी, मुंबई 

भारताच्या प्रगतीमध्ये दाऊदी बोहरा समुदायाचे योगदान आणि त्यांचे जागतिक स्तरावर असलेले महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नुकतीच माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईतील 'अलजामिया-तुस-सैफिया' या प्रतिष्ठित अकादमीला भेट दिली. यावेळी त्यांनी समुदायाचे ५३ वे धर्मगुरू परमपूज्य सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी या कॅम्पसच्या शैक्षणिक दर्जाचे आणि वास्तुकलेचे तोंडभरून कौतुक केले आहे.

स्मृती इराणी यांनी वेधले लक्ष

स्मृती इराणी यांनी या भेटीचे अनुभव सांगताना या संस्थेचा उल्लेख एक शैक्षणिक चमत्कार असा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०२३मध्ये उद्घाटन झालेली ही संस्था आपल्या संस्कृतीची ओळख जपून आधुनिक शिक्षण कसे देता येते, याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले. बदलत्या जगाच्या गरजा ओळखून परंपरांचे जतन करण्याचे बोहरा समुदायाचे कौशल्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भेटीत स्मृती इराणी यांनी बोहरा समुदायातील यशस्वी महिलांशीही संवाद साधला. या महिलांनी विविध व्यावसायिक क्षेत्रांत मिळवलेले यश आणि त्यांचा आत्मविश्वास हा नव्या भारताच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या शब्दांचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, बोहरा समुदायाची जागतिक उपस्थिती भारताची सांस्कृतिक आणि वैचारिक ओळख जगभर भक्कम करत आहे.

 

जागतिक राजनैतिक अधिकाऱ्यांच्या भेटी

 

केवळ भारतीय नेतेच नव्हे, तर परदेशातील राजनैतिक अधिकारीही या संस्थेच्या प्रेमात पडले आहेत. ओमानचे मुंबईतील महावाणिज्य दूत महामहीम महबूब इस्सा अल रईसी यांनीही नुकतीच या कॅम्पसला भेट दिली. सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांची भेट घेणे हा आपला सन्मान असल्याचे सांगून त्यांनी या संस्थेतील ज्ञान, शिस्त आणि समाजसेवेच्या भावनेचे कौतुक केले.

इजिप्तच्या महावाणिज्य दूत महामहीम डाहलिया तवाकोल यांनीही मरोळ येथील या कॅम्पसचा दौरा केला. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा हे मूल्य इजिप्त आणि बोहरा समुदायाला एकमेकांशी जोडते, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या भेटींमुळे भारत आणि इतर देशांमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.

 

नेमके काय आहे अलजामिया-तुस-सैफिया?

 

अलजामिया-तुस-सैफिया ही जागतिक दर्जाची अरबी अकादमी असून तिचे मुख्य केंद्र मुंबईत आहे. याशिवाय सुरत, नैरोबी आणि कराची येथेही याच्या शाखा आहेत. ही संस्था फातिमी तत्त्वज्ञानावर आधारित इस्लामिक शिक्षणासोबतच आधुनिक ज्ञान देण्याचे काम करते. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, बोहरा तरुण-तरुणींना भविष्यासाठी तयार करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. नुकतेच येथे 'अलजामिया-तुस-सैफिया बिझनेस स्कूल' देखील सुरू करण्यात आले आहे. २०२३मध्ये मुंबईतील मुख्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्याचे विस्तृत कवरेज ‘आवाज द व्हॉइस’ने केले होते.

शिक्षण, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मितीत बोहरा समाजाचे योगदान अमुल्य

सुमारे १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला बोहरा समुदाय भारताच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग आहे. शिक्षण क्षेत्रात केवळ अलजामियाच नव्हे, तर अनेक शाळांच्या माध्यमातून हा समाज सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. आरोग्य क्षेत्रात 'प्रोजेक्ट राईज'च्या माध्यमातून मुलांचे पोषण, कम्युनिटी किचन आणि मोठ्या प्रमाणावर समाजसेवा केली जाते.

 

व्यापार, जलसंधारण आणि अन्नसुरक्षा यांसारख्या क्षेत्रांत या समुदायाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या प्रामाणिकपणाची आणि शिस्तीची अनेकदा प्रशंसा केली आहे. जगातील ४० देशांत विखुरलेला हा समाज शांतता आणि एकतेचा संदेश देत भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करत आहे.

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter