काश्मीरमधील रमजान : खोऱ्यातील समन्वयवादी परंपरांचा अनोखा उत्सव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमीर सुहैल वानी

काश्मीरमध्ये रमजानचे आगमन म्हणजे केवळ कॅलेंडरवरील एका नव्या महिन्याची सुरुवात नसते. ऐतिहासिकदृष्ट्या त्याला एक सखोल अर्थ आहे. खोऱ्यातील आध्यात्मिक बहुलवादाच्या दीर्घ परंपरेने आकार दिलेल्या या महिन्याचे स्वागत आत्मचिंतन, नैतिक नूतनीकरण, सामाजिक करुणा आणि सांस्कृतिक निरंतरतेचा काळ म्हणून केले जाते.

उपवास किंवा रोजा हा जरी मुख्य इस्लामिक आचार असला, तरी काश्मीरमध्ये रमजान अत्यंत सांस्कृतिक पद्धतीने स्वीकारला जातो. यातून एक बहुस्तरीय अनुभव दिसून येतो. येथे श्रद्धा, गूढवाद आणि सामायिक सामाजिक मूल्ये यांचा शतकानुशतके सुरेख संगम झाला आहे.

प्रेषित मुहम्मद यांनी शिकवल्याप्रमाणे रोजा ठेवणे हा रमजानचा मुख्य धार्मिक गाभा आहे. यात नम्रता, संयम, गरिबांबद्दलची सहानुभूती आणि नैतिक आत्मशिस्तीवर भर दिला जातो. मात्र, काश्मीरमध्ये या शिकवणीचा संगम शैव तत्त्वज्ञान, बौद्ध ध्यानपरंपरा आणि स्थानिक संन्यासी प्रथांनी समृद्ध असलेल्या आधीच्याच चैतन्यमय वातावरणाशी झाला.

या परस्परसंबंधातून कोणतीही ताठर भिंत उभी राहिली नाही. उलट, यातून एक संमिश्र जीवनमूल्य आकाराला आले. यामुळेच रमजानसह इतर इस्लामिक आचारांकडे एका व्यापक आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. साधेपणा, आत्मपरीक्षण आणि करुणा या काश्मिरी सांस्कृतिक जाणिवेत खोलवर रुजलेल्या गुणांना अधिक महत्त्व दिले गेले.

या समन्वयात सुफी संतांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः चौदाव्या शतकात मीर सय्यद अली हमदानी यांच्या आगमनाने काश्मीरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जडणघडणीवर मोठा प्रभाव टाकला. त्यांनी केवळ इस्लामचा प्रसार केला नाही, तर नैतिक जीवन, हस्तकला, बौद्धिक कार्य आणि सामाजिक जबाबदारीलाही प्रोत्साहन दिले.

अशा प्रभावांमुळे, काश्मीरमधील रमजान केवळ उपवासाचा धार्मिक विधी राहिला नाही. तो नैतिक सुधारणा, समेट आणि सामूहिक कल्याणाचा काळ मानला जाऊ लागला. सुफी परंपरेतील आंतरिक बदलांवरील भराने स्थानिक आध्यात्मिक भावनांना साद घातली आणि त्यामुळे या महिन्याला एक वेगळेच चिंतनशील स्वरूप प्राप्त झाले.

लल्ला देद आणि शेख नूर-उद-दीन नूरानी यांच्यासारख्या संतांनी प्रतिनिधित्व केलेली स्थानिक ऋषी-सुफी परंपराही तितकीच महत्त्वाची होती. त्यांची शिकवण, कविता आणि आचरणातून असा आध्यात्मिक मानवतावाद व्यक्त झाला की त्याने औपचारिक धार्मिक भिंती सहज ओलांडल्या.

लल्ला देद यांच्या गूढ रचनांनी कर्मकांडांच्या पलीकडच्या आंतरिक प्रबोधनावर भाष्य केले. तर नूर-उद-दीन नूरानी यांनी साधेपणा, सहिष्णुता आणि नैतिक आचरणावर भर दिला. त्यांच्या प्रभावामुळे एक असे वातावरण तयार झाले आणि रमजानसह सर्व धार्मिक आचरण हे केवळ एका विशिष्ट समुदायाची ओळख न राहता सामायिक सांस्कृतिक मूल्यांचा भाग बनले.

ऐतिहासिकदृष्ट्या, रोजाच्या या महिन्यात विविध समुदायांमध्ये दिसणारा परस्पर आदर हा याच समन्वयवादी परंपरेचे दर्शन घडवतो. मग तो सामाजिक व्यवहारांमधील बदल असो किंवा सद्भावनेची कृती असो. पारंपारिकरित्या, चंद्रदर्शनाच्या खूप आधीपासूनच रमजानची तयारी सुरू होते.

बाजारपेठांमध्ये चैतन्य येते, मात्र तरीही त्यात एक संयम असतो. उधळपट्टी करण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर भर दिला जातो. घरांची साफसफाई केली जाते, प्रार्थनेची ठिकाणे स्वच्छ केली जातात आणि कुटुंबे आपले नातेवाईक व शेजाऱ्यांसोबतचे जुने वाद मिटवून नव्याने सुरुवात करतात.

या केवळ धार्मिक जबाबदाऱ्या नव्हत्या. आध्यात्मिक आचरणाची सुरुवात सामाजिक सलोखा आणि भावनिक शुद्धतेतूनच व्हायला हवी, हा सांस्कृतिक विश्वास त्यातून दिसून येतो. या तयारीमुळे केवळ एका घरात नव्हे, तर संपूर्ण समाजात एक सामूहिक उत्साहाचे वातावरण कसे निर्माण व्हायचे, याच्या आठवणी काश्मीरमधील ज्येष्ठ नागरिक अनेकदा सांगतात.

या महिन्यात पवित्र स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त होते. हजरतबल दर्गा, श्रीनगरची जामिया मशीद आणि खानकाह-ए-मौला यांसारख्या ऐतिहासिक धार्मिक स्थळांवर सामूहिक नमाज, कुराण पठण आणि दातृत्व कार्याला वेग येतो.

ही ठिकाणे केवळ उपासनेची केंद्रे नसून ती सांस्कृतिक आधारस्तंभ आहेत. तिथे इतिहास, वास्तुकला, कविता आणि समाजजीवन एकत्र येते. रमजानमधील येथील संमेलनांमधून एक खास काश्मिरी भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. हे वातावरण शांत, चिंतनशील आणि सामूहिक आपलेपणाच्या भावनेने भारलेले असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ही स्थळे ऐतिहासिकदृष्ट्या सहजीवनाचे प्रतीक आहेत आणि तिथे आध्यात्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सर्वसमावेशकताही पाहायला मिळते.

मुघल साम्राज्याच्या काळातील ऐतिहासिक नोंदींनुसार, शाही आश्रयाखाली संघटित सामूहिक आचारांची मोठी भरभराट झाली. मशिदी, दर्गे आणि शैक्षणिक संस्था ही आध्यात्मिक शिक्षण, रात्रीची नमाज आणि दानधर्माची केंद्रे बनली.

राजकीय सत्तेने पायाभूत सुविधा निर्माण केल्या असल्या, तरी रमजानचा सांस्कृतिक स्वीकार हा मुख्यत्वे स्थानिक साधेपणा, गूढवाद आणि सामायिक सामाजिक मूल्यांवरच आधारलेला राहिला. रमजानचे स्वागत करण्यात घराच्या उंबरठ्याला नेहमीच मध्यवर्ती महत्त्व राहिले आहे.

पहाटे उपवास सुरू करण्यापूर्वी (सेहरी) कुटुंबे एकत्र येतात आणि सूर्यास्तानंतर इफ्तारसाठी पुन्हा एकत्र जमतात. या दिनचर्येमुळे कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट होतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या खानपानाच्या परंपरेत सांस्कृतिक स्मृती आणि आध्यात्मिक प्रतीके दडलेली असतात, ज्यामध्ये चंगळवादापेक्षा साधेपणा आणि कृतज्ञतेवर अधिक भर दिला जातो.

घरातील मोठी माणसे या काळाचा उपयोग लहान मुलांना नैतिक शिकवण, धार्मिक ज्ञान आणि सांस्कृतिक गोष्टी सांगण्यासाठी करतात. त्यामुळे रमजान हा केवळ एक धार्मिक सण न राहता दोन पिढ्यांमधील संस्कारांचा वर्ग बनतो. दानधर्म हा या महिन्यातील सर्वांत ठळक पैलू आहे. गरिबांना मदत करणे, गुप्त आर्थिक मदत, अन्नदान आणि समाजकल्याणाचे उपक्रम रमजानमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवले जातात.

इतिहासात डोकावून पाहिल्यास ही उदारता अनेकदा धार्मिक सीमा ओलांडताना दिसते. यातून शेजाऱ्यांमधील एकोपा वाढतो आणि खोऱ्याची परस्पर काळजी घेण्याची दीर्घकालीन नीतिमत्ता दिसून येते. दिखावा करण्यापेक्षा गुप्त दानावर असलेला भर हा इस्लामिक शिकवण आणि नम्रतेला महत्त्व देणाऱ्या काश्मिरी सांस्कृतिक भावनेशी अगदी मिळताजुळता आहे.

काश्मीरमधील रमजानचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे चिंतनशील सौंदर्य. दैनंदिन जीवनाची संथ गती, प्रार्थनेच्या आवाजाने भारावलेल्या शांत संध्याकाळ, भक्तीपूर्ण पठण आणि एकांताचे क्षण हे सर्व या प्रदेशाच्या खोलवर रुजलेल्या गूढवादी वारशाचे दर्शन घडवतात.

काश्मिरी सांस्कृतिक जीवनाचे वैशिष्ट्य असणारी कविता, आध्यात्मिक प्रवचने आणि वैचारिक बैठकांना या उपवासाच्या महिन्यात नवी ऊर्जा मिळते. ही आंतरिक ओढ काश्मीरच्या तत्त्वज्ञानविषयक विचारपूस आणि कलात्मक सूक्ष्मततेच्या व्यापक परंपरांशी जुळणारी आहे.

आधुनिकीकरण, शहरीकरण आणि सामाजिक-राजकीय गुंतागुंतीमुळे आज रमजान साजरा करण्याच्या काही पद्धतींमध्ये अपरिहार्यपणे बदल झाले आहेत. कामाचे बदललेले स्वरूप, डिजिटल संवाद आणि बदलत्या जीवनशैलीमुळे नवीन प्रवाह आले आहेत. तरीही, श्रद्धा, उदारता, सामाजिक जिव्हाळा आणि आत्मपरीक्षण यांवर आधारलेले मुख्य सांस्कृतिक स्वागत आजही अत्यंत भक्कमपणे टिकून आहे.

 

वेगाने होणाऱ्या बदलांच्या काळातही, रमजानमुळे सहजीवनाची आणि नैतिक जबाबदारीची सामायिक स्मृती जागी होते. ही स्मृती या खोऱ्याच्या ऐतिहासिक अनुभवात खोलवर रुजलेली आहे. थोडक्यात सांगायचे तर, काश्मीरमधील रमजानचे स्वागत हे धार्मिक आचरण व्यापक सांस्कृतिक ओळखीशी कसे एकरूप होऊ शकते, हे दाखवून देते.

या महिन्याने ऐतिहासिकदृष्ट्या आध्यात्मिकता आणि समाजजीवन, वैयक्तिक भक्ती आणि सामूहिक नैतिकता, तसेच या प्रदेशात शतकानुशतके एकत्र नांदणाऱ्या विविध श्रद्धा परंपरा यांच्यातील दुवा म्हणून काम केले आहे. यामुळे खोऱ्याला त्याच्या बहुलवादाच्या चिरंतन वारशाची आठवण होते. याच ठिकाणी आध्यात्मिक ओढीने अनेकदा सीमा ओलांडून माणुसकीची सामायिक भावना जोपासली आहे.

त्या अर्थाने, काश्मीरमधील रमजान हा केवळ उपवासाचा काळ नाही; तर तो गूढवाद, करुणा, सांस्कृतिक संवाद आणि सामूहिक स्मृतीतून आकाराला आलेल्या नागरी मूल्यांचा पुनरुच्चार आहे. रोषणाई केलेले दर्गे, प्रार्थनेची शांत लय, दातृत्वावर दिलेला भर आणि परस्पर आदराची भावना हे सर्व अशा एका परंपरेचे दर्शन घडवतात. या परंपरेत धर्म हा माणसांना विभागण्याचे नव्हे तर जोडण्याचे साधन बनतो.

दरवर्षी जेव्हा खोऱ्यात चंद्रदर्शन होते, तेव्हा तो चंद्र केवळ धार्मिक भक्तीचे वचन घेऊन येत नाही. तो चंद्र काश्मीरच्या ऐतिहासिक आत्म्याची ओळख असलेल्या सांस्कृतिक सलोख्याची चिरंतन आशाही सोबत घेऊन येतो.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter